बुलडाणा - प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांपैकी रविवारी रात्री 5 आणि सोमवारी 1 असे एकूण 6 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यात मलकापूर येथील 65 वर्षीय महिला, 18 वर्षीय तरूणी व 45 वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे. तर, शेलापूर येथील 55 वर्षीय पुरूष, 50 वर्षीय महिला आणि शेगाव येथील 30 वर्षीय तरुणाचाही समावेश आहे.
आज बुलडाणा कोविड केअर सेंटरमधील मलकापूर येथील तीन रुग्णांनी कोरोनावर मात केली. यामध्ये भीमगनर, मलकापूर येथील 60 वर्षीय महिला, मलकापूर येथील 43 वर्षीय पुरूष व 39 वर्षीय महिलेचा समावेश आहे. सोमवारी शेगाव येथे आढळलेला 30 वर्षीय तरुण हा मुंबई येथून परतला होता. सदर तरुण घरी न जाता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या हॉटेलमध्ये क्वारंटाईन झाला होता. त्यामुळे, पुढील धोका टळला आहे.
शेगाव येथील ही आतापर्यंतची पाचवी कोरोनाबाधित व्यक्ती आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या हॉटेलमधील स्टाफला सध्या क्वारंटाईन करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 542 जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. तर, 91 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. तर, 56 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या जिल्ह्यातील 32 कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.