बुलडाणा - जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात वन्यजीव विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर मेंढपाळांनी हल्ला केल्याची घटना पुन्हा घडली आहे. ही घटना पुन्हा ज्ञानगंगा अभयारण्य लगतच्या प्रादेशिक वनविभागाच्या जंगलात सोमवारी सायंकाळी घडली आहे. याप्रकरणी खामगाव तालुक्यातील हिवरखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी रून 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील सर्व मेंढपाळ आरोपी फरार आहेत.
ज्ञानगंगा अभयारण्याला लागून असलेल्या बुलडाणा-खामगांव मार्गावर असलेले मांडणी शिवारात बुलडाणा प्रादेशिक वन विभागाचे सहाय्यक उपवनसंरक्षक रणजित रघुवीर गायकवाड हे कर्मचाऱ्यांसह गस्तीवर होते. यावेळी जंगलात काही लोकांकडून अवैधपणे वनचराई करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तेव्हा अधिकाऱ्यांनी मेंढ्या जप्तीची कारवाई सुरू केली. यावेळी 2 जणांना ताब्यात घेऊन शासकीय वाहनात बसवले.
हेही वाचा-मुंबईत आठ हजार कुपोषित बालके; काँग्रेसकडून सव्वादोन हजार बालके दत्तक
दोन्ही आरोपींना घेऊन मेंढ्याच्या कळपाचा मालक फरार-
मेंढ्याच्या कळपाचा मालक मोतीराम रतन टिळे याने वनविभागाच्या शासकीय गाडीवर हल्ला करून वाहनाच्या काचा फोडल्या. सहाय्यक उपवनसंरक्षक गायकवाड व वनविभागाचे संतोष गिरनारे यांना मारहाण केली. मेंढ्याच्या कळपाचा मालक हा ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींना घेऊन फरार झाला. या प्रकरणी हिवरखेड पोलीस ठाण्यात सहाय्यक उपवनसंरक्षक रंजीत गायकवाड यांनी तक्रार दिली. नांद्री येथील आरोपी मोतीराम रतन टिळे याच्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. हिवरखेड पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.
हेही वाचा-Corona Update : रुग्ण, मृत्यूसंख्या घटली, ४ हजार ४०८ नवे रुग्ण तर ११६ जणांचा मृत्यू
10 ऑगस्टला घडली होती अशीच घटना
जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये अवैधरित्या मेंढी चराई करण्यासाठी गेलेल्या मेंढपाळांनी 10 ऑगस्टला वन कर्मचाऱ्यांवर लाठयाकाठ्यांनी हल्ला केला. तर वन्य कर्मचाऱ्यांनी हवेत गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. तर मेंढपाळ घटनास्थळावरून फरार झाले होते. त्यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हेही वाचा-नांदेड येथील राष्ट्रध्वज निर्मिती प्रकल्पाला अधिक सक्षम करू - पालकमंत्री अशोक चव्हाण