बुलडाणा - केंद्र आणि राज्य सरकारकडून ईडीचा वापर दबावतंत्रासाठी केला जात आहे, असा आरोप ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ विश्वास उटगी यांनी केला आहे. पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव बँक लिमिटेड आणि हुडकेश्वर पतपेढी या सारख्या अडचणीत आलेल्या संस्थांचे ठेवीदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक शेगावात बोलावण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा - ईडी प्रकरण : न्यायालयाच्या आदेशानेच गुन्हे दाखल - रावसाहेब दानवे
ईडीचा वापर केंद्र आणि राज्य सरकार दबावतंत्रासाठी करत आहे, असे सर्वच क्षेत्रात दिसून येत आहे. ईडी आणि सीबीआय सारख्या संस्था या सरकारच्या मालकीच्या नाहीत किंवा मंत्रिमंडळाच्या हुकूमावर चालणाऱ्या नाहीत. मात्र, ज्या पद्धतीने सरकारकडून कारवाई करण्यात येत आहे. ते लोकशाहीला धरुन नाही. लोकशाहीमध्ये तुम्ही तात्पुरते जिंकाल, पण अशा संस्थांचा वापर करून तुम्ही लोकांची मने जिंकू शकत नाही, असा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
हेही वाचा - भाजपच्या डोक्यात सत्तेची मस्ती; भारताची लोकशाही धोक्यात - धनंजय मुंडे
पवारांना ईडीकडून देण्यात आलेले नोटीस ईडीचा अतिघाईपणा आहे. माझ्या माहितीप्रमाणे पवारांचा त्या बँकेशी कुठलाही संबंध नाही आणि त्यांची चौकशी सुद्धा झालेली नाही. मात्र, निवडणुका तोंडावर आल्या असल्यामुळे हे दबाव तंत्राचे चित्र निर्माण केले जात आहे. दिल्लीला चिदंबरम यांनी अडकवून ठेवायचे आणि राज्यात शरद पवारांना अडकवून ठेवायचे, हे घाणेरडे राजकारण असल्याची टीका त्यांनी केली.