बुलडाणा - येथून जवळच असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यातून बुलडाणा- बोथा हा मार्ग जातो. दिनांक ५ जूनला जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वन्यजीव सोयरे निसर्गप्रेमी व वन्यजीव विभागाच्या संयुक्त विद्यमानाने येथे साफसफाई मोहीम राबविण्यात आली. यावेळी साफसफाईच्या माध्यमातून जागतिक पर्यावरण दिनी पर्यावरण वाचवण्याचा संदेश देण्यात आला.
सद्यस्थितीत वाढते प्रदूषण जागतिक समस्या बनली आहे. त्यामुळे पर्यावरण धोक्यात आले असून वेळीच सावध होण्याची गरज आहे. जंगल संवर्धन करणे काळाची गरज आहे. बुलडाणा शहराला लागून २० हजार हेक्टरवर ज्ञानगंगा अभयारण्य विस्तारलेले आहे.
या अभयारण्यात बिबट्या, अस्वल, लांडगा, रानडुक्कर, तडस, कोल्हा, हरीण, काळवीट, मोर, रानमांजर, ससा, घुबड आदी पशु-पक्षी आहेत. अभयारण्यातून बुलडाणा- खामगाव मार्ग जात असल्यामुळे या रस्त्यावर कायम वर्दळ असते. या मार्गावर प्रवाशी टाकाऊ वस्तू फेकतात. जंगलातून रस्ता ओलांडणाऱ्या वन्यप्राण्यांना यामुळे इजा होण्याचा धोका संभवतो. या व्यतिरिक्त टाकून दिलेले प्लास्टिक, शिळे अन्नपदार्थ खाल्ल्याने वन्यप्राण्यांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नेमकी हीच बाब लक्षात घेऊन वन्यजीव सोयरे व वन्यजीव विभागाने शनिवारी जागतिक पर्यावरण दिनी कौतुकास्पद उपक्रम राबविला. ज्ञानगंगा अभयारण्यातील मार्गाची सकाळी सफाई करण्यात आली. गोंधनखेड नाका ते बोथा नाकापर्यंत ही सफाई मोहीम राबवत पर्यावरण वाचविण्याचा संदेश देण्यात आला. यावेळी वन्यजीव अकोला विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक साबळे व वन्यजीव बुलडाणा विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मयूर सूरवसे यांच्यासह अनेकांनी श्रमदान केले.