बुलडाणा- जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील लोणीगवळीमध्ये गेल्या पंधरा दिवसापासून सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाची नासाडी झाली आहे. पावसामुळे सोयाबीनला अंकूर फुटले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून जगाचा पोशिंदा हतबल झाला आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे.
जिल्ह्यात मेहकर, लोणार, सिंदखेड राजासह इतर तालुक्यात परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. काढलेली सोयाबीन पाण्यात भिजली आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले आहे. मेहकर तालुक्यातील लोणी गवळी येथील शेतकरी गजानन जागृत, संजय जागृत व महिला शेतकरी अंतकला रौंदळे यानी बटाईने घेतलेल्या शेताची परिस्थिती फारच बिकट आहे.
शेतकऱ्यांनी नुकतीच सोयाबीन सोंगून शेतात टाकली होती. मात्र, सोयाबीन परतीच्या पावसात भिजली, त्यामुळे गजानन यांना ७ एकर मधील पिकाचे अंदाजे १ लाख ५० हजार रुपये, संजय यांना १० एकरमधील पिकाचे अंदाजे २ लाख ५० हजार रुपये व भूमिहीन असलेल्या अंतकला यांनी बटाईने केलेल्या ५ एकर शेतातील पिकाचे अंदाजे १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
हेही वाचा- विविध नेटवर्क कंपनी विरोधात स्वाभिमानीचे बुलडाण्यात शोले स्टाईल आंदोलन