बुलडाणा - गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात संततधार सुरू असून, पुढील काही दिवस पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आठवडाभरापासून सतत सुरू असलेल्या दमदार पावसाने जिल्ह्यातील नदी, नाले तुडूंब भरले आहेत. तसेच पैनगंगा, पूर्णा, मन, बोर्डी, ज्ञानगंगा या सर्व नद्या दुथडी भरुन वाहू लागल्याने अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली आहे.
संपूर्ण जिल्हा मागील चार वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसत होता. जमिनीखालील पाण्याची पातळीही खालावल्याने मागील उन्हाळ्यात अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई होती. मात्र, यावर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे आणि बंधारे भरले आहेत.
या वर्षी आतापर्यंत सरासरीच्या ९४ टक्के पाऊस झाला असून, मागील वर्षी २२ सप्टेंबर पर्यंत ५६३६.५ मी.मीटर पाऊस पडला होता. यंदा ८१५६.२ मी.मीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील शेगाव, खामगाव, नांदुरा, मलकापूर, जामोद आणि संग्रामपूर या ६ तालुक्यांमध्ये पावसाचा जोर जास्त आहे. यंदा या पाचही तालुक्यांनी १०० मी.मीटरची पावसाची पातळी ओलांडली आहे.
खडकपूर्णा प्रकल्पामध्ये 41 टक्क्यांची वाढ
गेल्या आठवडा भरापासून सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असल्याने बहुतांश प्रकल्पांमध्ये पाणीसाठा वाढला आहे. जालना जिल्ह्याला लागून असलेल्या देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा या प्रकल्पामध्ये केवळ मृतसाठा शिल्लक होता. मात्र, मुसलधार पावसामुळे या धरणात 41 टक्के पाणीसाठा झाला आहे. तसेच परतीचा पावसाचे प्रमाण वाढल्यास धरणामधील पाण्याची आवक वाढणार आहे.
खामगाव तालुक्यात पूरपरिस्थिती
खामगाव तालुक्यातील पळशी बु. मध्ये अनेक वर्षे सरासरीच्या निम्मा पाऊस पडत होता. मात्र, 21 सप्टेंबरला मुसळधार पाऊस झाल्याने पळशीसह पंचक्रोशीच्या परिसरातील 30 वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे. सततच्या पावसाने येथे पूरस्थिती निर्माण झाली होती. दुपारी 2 नंतर पुराने रौद्ररूप धारण केल्याने या गोपाळ सुधाकर चव्हाण यांचे शेतातील काही झालेल्या पिकाचे नुकसान झाले आहे.