बुलडाणा - शेगाव व खामगाव तालुक्यातील काही भागात 15 जुलैच्या मध्यरात्री रोजी ढगफुटी झाली. अनेकांच्या शेतजमिनी वाहून गेल्या तर अनेकांची घरे पडली. जनावरे वाहून गेली. घरातील साहित्यही वाहून गेल्याने त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. शेगाव तालुक्यातील जवळा पळसखेड, जवळा बुद्रुक तसेच खामगाव तालुक्यातील हिंगणा, उमरा व लासुरा शिवारासह शेगाव व खामगाव तालुक्यातील 18 गावे बाधित झाली आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी या गावांना भेटी देवून नुकसानीची पाहणी केली. या भागातील नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे, त्यामुळे शासनाने तात्काळ संपूर्ण नुकसान भरपाई द्यावी व बेघरांना तात्काळ आश्रय देऊन त्यांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे.
खामगाव व शेगाव तालुक्यातील काही भागात 15 जुलै रोजी मध्यरात्री अतिवृष्टी झाली. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी अक्षरश: खरडून गेल्या. तीनफुटापर्यंतचा गाळ वाहून गेल्याने शेतामध्ये मुरुम, दगडे उघडी पडली आहेत. नदी काठावरील गावामधील घरांमध्ये पाणी घुसल्याने त्यांचे संसारोपयोगी साहित्य वाहून गेले, अनेक घरे पडली त्यामुळे त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. अनेकांच्या दुकानांमध्ये पाणी घुसून सर्व साहित्य खराब झाल्याने प्रचंड नुकसान झाले. काहींच्या कोंबड्या, बकऱ्या व इतर पशुधन वाहून गेले. गावागावांतील विद्यूत खांब पडले. शिवाय उस्मानखॉ सरदारखॉ ही व्यक्ती नदीच्या पुरात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. एवढी भीषण परिस्थिती असताना तीन दिवस होऊनही प्रशासन अद्यापही मदतीसाठी पोहचले नाही.
दरम्यान, रविकांत तुपकर यांनी यांनी आज शनिवारी (दि. 18 जुलै) शेगाव तालुक्यातील जवळा पळसखेड, जवळा बुद्रूक तर खामगाव तालुक्यातील हिंगणा, उमरा व लासुरा शिवार या नुकसानग्रस्त भागाचा पाहणी केली. मन व्यथीत करणारे आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे संताप आणणारे दृष्य त्यांना दिसून आले. अनेकांना राहण्यासाठी घर नाही, जेवणाची व्यवस्था नाही. सव्वा महिन्याच्या बाळाला घेवून सायराबी रशीदखॉ या महिलेचा संसार उघड्यावर पडल्याने तिला बाळाला घेवून नदीच्या काठावरील उघड्या जागेवर रहावे लागत असल्याचे दुर्दैवी चित्र दिसून आले. रविकांत तुपकर यांनी नुकसानग्रस्तांच्या व्यथा जाणून घेत त्यांना आधार दिला. प्रचंड नुकसान होऊन 3 दिवस उलटूनही कोणत्याही प्रकारे बेघर नागरिकांची राहण्याची, पिण्याच्या पाण्याची, जेवणाची व आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने कोणतीही व्यवस्था न केल्याने रविकांत तुपकर यांनी संताप व्यक्त केला. गटविकास अधिकारी, तहसीलदारांशी संपर्क साधून झालेल्या नुकसानीची माहिती देत मदत व आवश्यक सुविधा पोहचविण्याबाबत चर्चा केली. शासनाने नुकसानग्रस्तांना संपूर्ण नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करत जर बेघर झालेल्यांची राहण्याची व जेवण्याची पर्यायी व्यवस्था केली नाही तर प्रशासनाला गंभीर परिणामाला सामोरे जावे लागेल, असा इशारा रविकांत तुपकरांनी यावेळी दिला.