बुलडाणा/मुंबई Ravikant Tupkar : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थिती कापूस आणि सोयाबीनला योग्य भाव मिळण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन (Ravikant Tupkar Protest Mantralaya Mumbai) छेडलंय. तसा अल्टीमेटम देखील तुपकर यांनी राज्य सरकारला दिलाय. बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील सोमठाना येथे तुपकर यांनी मागील चार दिवसांपासून अन्न त्याग आंदोलन देखील सुरू केलं होतं. आता पुढील आंदोलन ते मुंबईत करणार आहेत. तसेच 29 नोव्हेंबरला तुपकर हे मंत्रालयाचा ताबा घेणार आहेत. त्यासाठी ते बुलडाणा येथून मुंबईकडं रवाना झाले. यावेळेस त्यांना त्यांच्या पत्नी व आईनं ओवाळलं.
काय आहेत प्रमुख मागण्या? : येलो मोझॅक, बोंडअळीमुळं व पाऊस खंड पडल्यानं सोयाबीन-कापूस व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी एकरी १० हजार रुपये, सरसकट नुकसान भरपाई मिळावी, सोयाबीनला प्रति क्वि. किमान ९ हजार व कापसाला किमान १२ हजार ५०० रुपये भाव मिळवा, चालू वर्षाची पिकविम्याची अग्रिम व १०० टक्के पिकविमा भरपाई मिळावी, दुष्काळ जाहीर करून तातडीनं मदत अदा करावी यासह इतरही विविध मागण्या रविकांत तुपकर यांच्या आहेत.
मंत्रालयाचा ताबा घेणार : सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकरी, शेतमजूरांच्या मागण्यांसाठी २८ नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता रविकांत तुपकर हे हजारो शेतकऱ्यांसोबत मुंबईकडं रवाना झाले. तसेच २९ नोव्हेंबर रोजी मुंबईत मंत्रालयावर धडक देऊन, मंत्रालय ताब्यात घेण्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारला दिलाय. दरम्यान, बुलडाणा शहर पोलिसांनी तुपकरांना २५ नोव्हेंबर रोजी अटक केली होती, तर न्यायालयानं त्यांची अटक कायदाबाह्य ठरवून सुटका केली होती. तेव्हापासून तुपकरांनी चिखली तालुक्यातील सोमठाना येथे अन्न त्याग आंदोलन सुरू केलं होतं.
मनोज जरांगे पाटलांचा पाठिंबा : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी थेट रविकांत तुपकर यांना फोन करून तब्येतीबाबत विचारपूस केली. तसेच तुपकर यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं. मंगळवारी रविकांत तुपकर हे मुंबईच्या दिशेने जात असतानाच मनोज जरांगे पाटील यांचा फोन आला होता. यावेळी त्यांनी जाहीर पाठिंबा दर्शवलाय.
हेही वाचा -