बुलडाणा : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कापसाच्या भावात वाढ, पीक विमा, अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे, पेरणीपूर्वी पीक कर्ज वाटप, प्रती दहा हजार रुपये मदत या प्रमुख मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे सातत्याने आंदोलन सुरू आहे. सरकार दुटप्पी धोरण राबवत आहे, असा आरोप होत आहे. 15 जूनपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास 16 जून रोजी शेतकऱ्यांना घेऊन मुंबई शेअर बाजाराच्या 20 व्या मजल्यावरील एआयसी कार्यालयातून उडी मारण्याचा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करीत त्यांना बुलडाण्यातून ताब्यात घेतले आहे.
तुपकर पोलिसांच्या ताब्यात : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मुंबई येथे पिक विमा कंपनी कार्यालय असलेल्या इमारतीच्या मजल्यावरून शेतकऱ्यांसह आत्महत्या करण्याचा गंभीर इशारा दिला होता. त्यानंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली होती. शहर पोलिसांनी प्रत्यक्ष घरी जाऊन त्यांना नोटीस देखील बजावली होती. तरी देखील रविकांत तुपकर आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. त्यामुळे पोलिसांनी थेट रविकांत तुपकर यांच्या घरी जाऊन त्यांना अटक करून पोलीस स्टेशनमध्ये आणले आहे. नुकतीच कारवाई झाली असल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
मागे हटणार नाही : शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी माझ्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी चालेल. मी मागे हटणार नाही. तसेच राज्यातील शेतकऱ्यांनी हिंसक भूमिका घेऊ नये. कोणीही कायदा हातात घेऊ नये. आम्हाला शांततेने आंदोलन करायचे आहे. मला ताब्यात घेण्यात आले असले तरी मला कुठे नेले जात आहे हे मला माहीत नाही. गरीब शेतकरी लक्षात ठेवा, आमच्यावर विविध गुन्हे दाखल करण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्यामुळे त्यात अडकू नका. रविकांत तुपकर यांनीही शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून तुपकर ताब्यात : सोयाबीन, कापसाचे भाव, पीक विमा, अतिवृष्टीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत. पेरणीपूर्वी पीककर्ज वाटप करण्यात यावे, शेतकऱ्यांना एकरी 10 हजार रुपये मदत देण्यात यावी, या मागणीसाठी रविकांत तुपकर सातत्याने आंदोलन करत आहेत. मात्र सरकार दुटप्पी धोरण राबवत आहे. त्यामुळे 15 जूनपर्यंत या मागण्या मान्य झाल्यास एकोणीस जून रोजी हजारो शेतकर्यांसह मुंबईत धडक देण्याचा इशारा तुपकर यांनी दिला होता. तसेच मुंबई शेअर बाजाराच्या 20 व्या मजल्यावरील विमा कंपनीच्या कार्यालयातून उडी मारण्याची तंबी त्यांनी सरकारला दिली होती. त्यामुळे कायदा, सुव्यवस्था बिघडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून तुपकर यांना अटक केल्याचे बोलले जात आहे.