बुलडाणा - पोलीस कर्मचारी तासन-तास उभे राहून प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडत आहे. यामुळे पोलिसांकरिता चेकपोस्ट ठिकाणी राहुट्यांची, पाण्याची, प्रसाधनगृहांची (मोबाईल टॉयलेट) व खुर्च्यांची व्यवस्था करा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
पोलीस कर्मचारी विशेषतः त्यामध्ये महिला कर्मचारी ही तासन्-तास उभ्या राहून ड्युटी करतात. त्यात वाढता उन्हाळा, प्रसाधनगृहांची व्यवस्था नाही,पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था नाही, बसायला खुर्च्या नाही, शेवटी पोलीस असले तरी ती माणसेच आहेत. ते आपल्यासाठी प्राणपणाला लावून लढताहेत. त्याच्या सुरक्षेची जबाबदारी ही आपलीच आहे. या उद्देशाने ही मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे.