नागपूर - महार बटालियनमध्ये युद्ध लढण्याचे सामर्थ्य आहे. अनेकवेळा त्यांनी हे सिद्ध देखील केले आहे. चीनसोबत झालेल्या युद्धात महार बटालियनने आपले सामर्थ्य दाखविले होते. यामुळे सैन्य भरतीकडे जास्तीत जास्त दलित तरुणांनी वळावे आणि देशाची सेवा करावी, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले. नागपुरात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी १४ फेब्रुवारीला पुलवामामध्ये वीर मरण आलेल्या सीआरपीएफ जवानांना श्रद्धांजली दिली. बुलडाणा जिल्ह्यातील वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंब उदरनिर्वाहासाठी त्यांना पेट्रोल पंप देण्यात यावे, अशी मागणी देखील त्यांनी शासनाकडे केली असल्याचे सांगितले. तसेच, पाकिस्तान सतत कारस्थान रचत असतो आणि रक्तपात घडवून आणतो. एकदाची मोठी कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे. जवानांवर झालेल्या घटनेचा बदला सरकार घेईल आणि त्यावर अंमलबजावणी सुरू झाली आहे, असेही ते यावेळी म्हणाले