बुलडाणा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेल्या कर्जमाफीचा फायदा गावातील ५ लोकांनाही मिळत नाही. द्यायचं नाही तर लोकांना फसवता का? गंडवता का? असे सवाल करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी सरकारवर टीका केली. कर्जबाजारीपणाला कंटाळून रोज १० शेतकरी आत्महत्या करत आहेत. तुम्हाला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात राजू शेट्टींनी राज्य सरकारवर प्रहार केला.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हायच्या आधी मी शेतकऱ्यांना तुम्हाला चिंतामुक्त करतो, कर्जमुक्त करतो, सातबारा कोरा करतो म्हणाले होते. आता जाहीर केलेल्या कर्जमाफीचा फायदा गावातील ५ लोकांनाही मिळत नसल्याचे शेट्टी म्हणाले. शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नाकडे हे सरकार दुर्लक्ष करत असल्याचेही शेट्टी म्हणाले.
हेही वाचा - नागपुरात मध्यान्ह भोजनातून ३२ विद्यार्थ्यांना विषबाधा; रुग्णालयात उपचार सुरू
हेही वाचा - 'सुटाबुटातल्या सरकारमुळे देशाची अवस्था अतिदक्षता विभागातल्या रुग्णासारखी'
ओला दुष्काळाच्या पार्शभुमीवर शेतकऱ्यांचा भ्रमनिराश करणाऱ्या सरकारच्या विरोधात राजू शेट्टी, रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात आज (शुक्रवार) बुलडाण्याच्या जळगाव जामोद याठिकाणी उपविभागीय कार्यालयावर क्रांती मोर्चा काढण्यात आला. सरसकट कर्जमाफी करुण शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, पिकविमा 100 टक्के मंजूर करून बँक खात्यात जमा करण्यात यावा. तसेच सीएए, एनआरसी कायदा तत्काळ रद्द करण्यात यावा. या मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
हा मोर्चा कृषी उत्पन्न बाजार समितीपासून उपविभागीय कार्यालयावर काढण्यात आला. मोर्चानंतर आयोजित सभेत राजू शेट्टींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह सरकारवर टीका केली.