बुलडाणा - भाजप नेते आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वक्तव्याचा शेगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीकडून निषेध व्यक्त करण्यात आला. शेगावमधील चौकात लोणीकरांच्या पुतळ्याला जोडे मारून तो जाळण्यात आला.
जालना जिल्ह्यातील एका जाहीर कार्यक्रमात बबनराव लोणीकर यांनी महिला तहसिलदारांना 'हिरोईन' असे संबोधले. लोणीकरांच्या या भाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यांच्या या वक्तव्याचा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस नंदा पाऊलझगडे यांच्या नेतृत्वात निषेध करण्यात आला.
हेही वाचा - 'दिल्लीला दोष देणाऱ्या नाही, तर दिशा देणाऱ्या सरकारची गरज'
जिजाऊ आणि सावित्रीच्या लेकींना लोणीकरांसारखे लोक हिरोईन म्हणत आहेत. लोणीकरांसारख्या व्हिलनचा सुपडासाफ करायला महिलांना वेळ लागणार नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश सरचिटणीस नंदा पाऊलझगडे यांनी लोणीकरांवर टीका केली.
काय म्हणाले होते लोणीकर -
जालन्यातील एका कार्यक्रमात लोणीकर म्हणाले होते की, 'सरकारकडून २५ हजार रुपये अनुदान पाहिजे असेल तर परतूरला मोर्चा काढला पाहिजे. सगळ्या सरपंचांनी आपापल्या गावातून गाड्या आणल्या पाहिजेत. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांनी ताकद लावली पाहिजे. जर अधिवेशनाच्या आधी मोर्चा झाला, तर मी २५ हजार लोक आणेल, ५० हजार लोक आणेल. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील आणि सुधीर भाऊंना आणू. तुम्हाला वाटले तर एखादी हिरोईन आणू आणि नाही जर कोणी भेटले तर तहसीलदार मॅडम हिरोईन आहेतच, त्या निवेदन घ्यायला येतील.