बुलडाणा- जिल्ह्यातील भेंडवळ येथे तीनशे वर्षांपासून घटमांडणी करून धान्याच्या आधारे पीक, पाऊस, नैसर्गिक आपत्ती तसेच राजकीय भाकीत वर्तविण्यात येते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी गावाबाहेरील शेतात घटाची आखणी केली जाते आणि दुसऱ्या दिवशी या मांडणीवरून येथील पुंजाजी महाराज भाकीत करतात.
त्यांचे वंशजदेखाल हे भाकीत करत होते. या भाकीतकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असते. आज ७ मेला घटाची आखणी केली जाणार आहे. तर ८ मेला भाकीत समोर येणार आहे. यावर्षी काय भाकीत येणार याच्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
मागील वर्षी १८ एप्रिल २०१८ रोजीही घट मांडणीच्या दुसऱ्या दिवशी पुंजाजी महाराजांनी आपले भाकीत जाहीर केले होते. या भविष्यवाणीला माध्यमातून भरभरून प्रसिद्धी दिली जाते. पण पुढे ही भाकीत किती खरी ठरते, यावर माध्यमे भाष्य करताना दिसत नाहीत. मागील वर्षीच्या भविष्यवाणीत देशात पाऊस सर्वसाधारण असेल तसेच जनतेला दुष्काळाला सामोरे जावे लागणार नाही, असे भाकित जाहीर करण्यात आले होते. मात्र, देश तर सोडाच ज्या राज्यात हे भाकीत सांगितले गेले तेच राज्य दुष्काळात होरपळले जात आहे. यामुळे भेंडवळची भविष्यवाणी किती खरी किती खोटी ? यावर आता चर्चेला वेग आला आहे.
एकही भाकित खरे ठरले नाही
मागील वर्षीच्या भाकीतामध्ये बळीराजाला दिलासा देणारी भेंडवळची भविष्यवाणी जाहीर झाली होती. राज्यात पाऊस सर्वसाधारण राहील. यंदा साधारण पीक येणार असल्याने शेतकऱ्याचे उत्पादनही सर्वसाधारण राहील, तसेच शेतमालाचे बाजार फारसे बदलणार नाहीत. शेतमालाच्या भावात खूप तेजी संभवत नाही, असे भाकीत वर्तविण्यात आले होते. भेंडवळच्या भाकीतानुसार जूनमध्ये सर्वसाधारण पाऊस तर जुलैमध्ये त्यापेक्षा जास्त पाऊस आणि ऑगस्टमध्ये मात्र, पावसाचा जोर राहणार असून सप्टेंबरमध्ये पाऊस कमी राहणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र तसेही झाले नाही.
हा सगळा संधिग्धतेचा व्यवहार- अंधश्रद्धा निर्मूलन समिती
भेंडवळ या गावात प्रचंड प्रमाणात दुष्काळ आहे. पुलवामा हल्ला असेल, गडचिरोलीचा हल्ला असेल किंवा आत्ताचा आलेले चक्रीवादळ असेल, याचा कुठेच उल्लेख यांच्या भविष्य कथानामध्ये नव्हता. हा सगळा संधिग्धतेचा व्यवहार आहे. भविष्य कथनाच्या नावाखाली प्रसारमाध्यमे याची दखल घेत आहेत तसेच आणि बी-बियाणांच्या कंपन्या याठिकाणी मोठ्या प्रमाणात दुकाने लावून येथे यात्रेचे स्वरूप देत आहेत. परंतु जो शिकलेला शेतकरी आहे, तो या प्रकाराला परंपरा म्हणून पाहतो आणि त्याला गांभीर्याने घेत नाही, अशी वस्तुस्थिती असल्याचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा. नरेंद्र लांजेवार यांनी सांगत भेडवळच्या घटमाडणीवर टीकास्त्र सोडले.