बुलडाणा - सर्वधर्म समभावाच्या प्रतीक असलेले हाजी अब्दुल रेहमान उर्फ सैलानी बाबांच्या यात्रेच्या पोस्टरवर राजकीय पक्षाच्या नेत्याचा फोटो छापण्यात आला आहे. फोटोमूळे आचारसंहिता भंग झाल्यामुळे सी-व्हिजिल अॅपवरुन केलेल्या तक्रारीवरून बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात प्रकाशावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरापासून जवळच असलेल्या प्रसिद्ध सैलानी बाबाचा दर्गा आहे. दरवर्षी होळीनंतर बाबाचा संदल असतो. यानिमित्त लाखो भाविक यात्रेत येऊन सैलानी बाबांचे दर्शन घेतात. यात्रेवेळी संदलचा दिनांक, फातेया खानीचा दिनांक, विशेष सहयोग करणाऱ्यांसह राजकीय नेत्यांचे फोटो, पद दरवर्षी यात्रा पोस्टरवर लावण्यात येते. यावर्षी अशाप्रकारचे जिल्ह्यात पोस्टर लावण्यात आले होते. मात्र, यावेळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू आहे. सैलानी यात्रा पोस्टरवर वक्फबोर्ड अध्यक्ष एम.एम.शेख, अल्पसंख्यांक आयोग अध्यक्ष हाजी अराफत, माजी मंत्री तथा काँग्रेसचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार, आमदार-खासदार यांचे फोटो होते.
यामुळे १९ मार्च रोजी रात्री ९ वाजून ३३ मिनिटांनी बसस्थानकावरील यात्रेचे पोस्टर निवडणूक आयोगाच्या सी व्हिजिल अॅपवर अपलोड करण्यात आले होते. यावर तपासकरून अज्ञात प्रकाशक विरुद्ध भरारी पथकाच्या तक्रारी वरून महाराष्ट्र मालमत्ता विरुपण प्रतिबंधक अधिनियम १९९५ च्या कलम ३ नुसार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सैलानी यात्रा पोस्टवर अस्थाई समितीचे रजिस्टर नंबर, संपर्क ई-मेल, सैलानी बाबा नावाची वेबसाईटही छापण्यात आली आहे. तरीही अज्ञात प्रकाशकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.