बुलडाणा - जिल्ह्यातील चिखली शहरात प्रतिबंधित गुटख्याच्या गोडाऊनवर सोमवारी सकाळी 7 च्या दरम्यान पोलिसांनी छापा मारून लाखोंचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले असून एक जण पळून गेला.
सदर घटना बुलडाणा जिल्ह्यातील चिखली पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खैरुशाह बाबा दर्गा परिसरात घडली. येथे सरकारद्वारा प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची विक्री करणारा अब्दुल निसार अब्दुल कादर कुरेशी याने गुटखा आणून जहीर खान अजीज खान याच्या घरात लपवून ठेवला होता. तो या गुटख्याची चोरुन लपून विक्री करत असल्याची माहीती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे चिखली पोलीस ठान्याचे ठाणेदार गुलाबराव वाघ यांच्या निर्देशानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून गुटखा गोडाऊन वर छापा मारला.
हेही वाचा - विवाहबाह्य संबंधातून प्रियकराच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खून
यावेळी जहिर खान अजीज खान याच्या राहत्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात २ मोठया पांढऱ्या पोत्यांमध्ये राजनिवास सुगंधित पानमसाला व ९ पांढऱ्या रंगाच्या पोतड्या आढळून आल्या. त्या उघडल्या असत्या त्यामध्ये 28 पोतडे प्रतिबंधित गुटखा मिळून आला आहे. यावेळी घटनास्थळावरुन अब्दुल निसार अब्दुल कादर कुरेशी हा पळून जाण्यात यशस्वी झाला. तर, जहीर खान अजीज खान यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर माल ताब्यात घेऊन पंचनामा करून हा गुटखा पोलीस ठाणे चिखली येथे जमा करण्यात आला आहे. हा गुटखा 3 लाख 64 हजार रुपयांचा असून चिखली पोलीसांनी या कारवाईची माहिती अन्न व औषध अधिकारी यांना कळविली असल्याचे सांगितले. या प्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.
हेही वाचा - बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयचं पडलं आजारी, घाणीच्या साम्राज्याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष...