बुलडाणा - शेगावातील राजेश उर्फ गणेश गजानन बोदडे या तरुणाचा दगडाने ठेचून केल्याची घटना 12 मे रोजी घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी मुंबईतून मारेकऱ्यांना अटक केली आहे. राहूल उर्फ लाशा समाधान रावणचोरे आणि लालू उर्फ बुऱ्या इमरत वाडे असे मारेकऱ्यांची नावे आहेत. दारूच्या नशेत राजेशने शिवीगाळ केल्यामुळेच हा खून केल्याची कबुली मारेकऱ्यांनी पोलिसांकडे दिली आहे.
राजेश उर्फ गणेशचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना रविवारी सकाळी शेगावात उघडकीस आली होती. तो मंदिर परिसरात राहणारा आहे. शुल्लक कारणावरून एका भिकाऱ्याला ठार मारल्याचा आरोप राजेशवर होता. नुकताच तो जेलमधून जमानतीवर सुटून आला होता. 12 मे रोजी रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना जानोरी गेटजवळ त्याचा मृतदेह पडलेला आढळून आला होता.
राहूल उर्फ लाशा समाधान रावणचोरे ( वय22 वर्षे रा. जयपूर कोथळी ता.मोताळा ह मु रेल्वेस्टेशन शेगाव ) व लालू उर्फ बुऱ्या इमरत वाडे ( वय 20 वर्षे रा.देशमुख फैल अकोला ह. मु. रेल्वेस्टेशन शेगाव ) यांनी सदर तरुणाचा खून करुन फरार झाल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली होती. त्या माहितीवरुन शेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनील हुड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी उपनिरीक्षक व्ही. एस. आरसेवार व त्यांच्या पथकाने मुंबईत शोध घेतला, मात्र आरोपी तेथे मिळून आले नाहीत.
राजेशचे मारेकरी सातारा रेल्वेस्थानकावर असल्याची माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी तेथे जाऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यांना शेगावला आणून 17 मे रोजी अटक केली. आरोपींना शेगाव न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी दिली.