बुलडाणा - जिल्ह्यात शुक्रवारी रात्री काही भागात मुसळधार पाऊस झाला. मेहकर, लोणारसह इतर गावांना पावसाचा फटका बसला. मुसळधार पावसाने पैनगंगा नदीला पूर आला आणि नदी काठाच्या शेतातील सोयाबीनच्या गंजी वाहून गेल्या. पुरामुळे काही गावांचा संपर्कही तुटला.
काढणी करून ठेवलेल्या सोयाबीनच्या उभ्या गंजी पुरात वाहून गेल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले असून लाखोंचे नुकसान झाले आहे. मेहकर तालुक्यातील दादूलगव्हाण, गणपूर, देऊळगाव माळीसह इतर गावातील जवळपास ५० पेक्षा जास्त सोयाबीनच्या गंजी नदीच्या पुरात वाहून गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. याव्यतिरीक्त रात्रीही काही पीक वाहून गेले आहे.
हेही वाचा - अवकाळी पावसासाठी आढावा बैठक; मात्र, शिवसेनेच्या 'या' मंत्र्यांची दांडी
पैनगंगेसह इतर लहान नद्यांनाही पूर आल्याने काही गावांचा अद्याप संपर्क तुटलेला आहे. मात्र, प्रशासनातर्फे कुठलीही मदत मिळालेली नाही. प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.