बुलडाणा - जळगाव जामोद तालुक्यातील एका गावात शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास नैसर्गिक विधीसाठी बाहेर गेलेल्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर चार तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. प्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी तीन तरुणांना अटक केली असून एक तरुण फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास 15 वर्षीय पीडित मुलगी गावाबाहेर गेली होती. तिच्यावर पाळत ठेवून सागर मांडोकर, टिल्या उर्फ प्रवीण इंद्रभान भिलंगे, संदीप वसंत जवंजाळ, ज्ञानेश्वर प्रभाकर शित्रे या चौघांनी तिला गाठले व तिच्यावर बलात्कार केला.
जळगाव जामोद पोलिसांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून शनिवारी पहाटे साडे पाचलाच तीन तरुणांना अटक केली आहे. एक जण फरार असून, त्याचा शोध घेतला जात आहे. पोलीस सूत्रांनी सांगितले की, 15 वर्षीय मुलगी काल रात्री आठच्या सुमारास गावाबाहेर गेली होती. तिच्यावर पाळत ठेवून चौघांनी तिला गाठले. तिच्या तोंडावर कापड टाकून तोंड दाबून चौघांनी मिळून तिला एका मंदिराकडे ओढत नेले व आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. जर घरच्यांना सांगितले तर तुला मारून टाकू, अशी धमकी दिली व तेथून पळून गेले.
घरच्यांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता, तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यावरून तिने तिच्या चुलत भावासह जळगाव जामोद पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. टिल्या, संदीप, ज्ञानेश्वर यांना आज पहाटेच त्यांच्या घरातून अटक केली आहे. तर सागर फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सतीश वळवी, पोलीस कॉन्स्टेबल विकास गव्हाड, पोलीस कॉन्स्टेबल गणेश पाटील हे करीत आहेत.