बुलडाणा - जिल्ह्यातील खामगाव येथील एसटी आगार व्यवस्थापकाच्या विरोधात आलेल्या अनेक तक्रारींवरून आमदार आकाश फुंडकर जाब विचारण्यासाठी आले होते. त्यावेळी संतप्त झालेल्या एसटी कर्मचारी, प्रवासी यांच्यासह कार्यकर्त्यांनी व्यवस्थापकाला धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. तर यावेळी व्यवस्थापकाच्या निलंबनासाठी कार्यकर्त्यांनी काही वेळ ठिय्याही दिला होता. त्यानंतर वरिष्ठांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी जल्लोष साजरा केला.
गेल्या अनेक दिवसांपासून खामगाव येथील आगार व्यवस्थापक रितेश फुलपगारे हे मनमानी कारभार करत असून सर्वच कर्मचाऱ्यांना नाहक त्रास देत आहेत. तर महिला कर्मचाऱ्यांचे देखील मानसिक शोषण करत असून, पंढरपूर यात्रेसाठी अतिरिक्त बस न सोडता वारकऱ्यांची अडवणूक करणे, कर्मचाऱ्यांना ड्युटी लावण्यासाठी पैशाची मागणी करणे, कार्यालयात मद्य प्राशन करणे अशा विविध त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय आगार बंद आंदोलन छेडले. तर कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी गेलेल्या आमदार आकाश फुंडकर यांचे समोर कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापकाच्या वागणुकीचा पाढा वाचला. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्ते आणि प्रवाशांना रितेश फुलपगारे यांच्यावर ऑईल फेकत त्यांना लोटपाट केली. तर आमदार फुंडकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत दूरध्वनी वरून संपर्क करत रितेश फुलपगारे यांच्या निलंबनाची मागणी केली.
जोपर्यंत कारवाई होत नाही तो पर्यंत आगरामध्ये ठिय्या आंदोलन करण्याचा पवित्रा घेण्यात आला होता. मात्र, कारवाई करण्याचे आश्वासन मिळताच कर्मचाऱ्यांनी पेढे वाटून आनंद साजरा करत ठिय्या आंदोलन मागे घेतले. यावेळी मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.