बुलडाणा - परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले मूग उडीद सोयाबीनचे पीक हिरावून घेतले, त्यामुळे शेतकरी आधीच अडचणीत आहेत. त्यात आता पुन्हा एक नवीन संकट शेतकऱ्यांवर आले आहे. कापसाच्या पिकावर लाल बोंड अळीचा प्रार्दुभाव झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.
गेल्या चार वर्षांपासून कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओल्या दुष्काळामुळे शेतकरी हैरान झाले आहेत. या वर्षी सुरुवातीला समाधानकारक पाऊस पडल्याने, उत्पन्न चांगले होईल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र ऐन पीक काढणीच्या हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आणि आता कापसाच्या पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. खांमगावातील बोरीअडगाव येथील शेतकरी प्रल्हाद दुतोंडे यांनी आपल्या तीन एकर शेतीमध्ये कापसाचे पीक घेतले आहे. मात्र बोंड अळीमुळे या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तब्बल पाच ते सहावेळा फवारणी करून देखील बोंड अळीचा प्रार्दुभाव कमी होत नसल्याने, याचा मोठा फटका पिकाला बसला आहे. परिसरातील सर्वच शेतकऱ्यांची हीच अवस्था आहे. त्यामुळे कृषी अधिकाऱ्यांनी त्वरीत नुकसानाचे पंचनामे करावेत आणि मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.