बुलडाणा - मध्यप्रदेशातून जळगाव जामोद येथे बुऱ्हाणपूर रस्त्यावर देशी मॅगझीन घेऊन दोन जण येत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. त्यावरून बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने जळगाव जामोद पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचून एका आरोपीला ५ देशी मॅगझीन, १५ जिवंत काडतुसे, एक दुचाकी, मोबाईल असा ३ लाख १४ हजार ४४० रुपयांचा मुद्देमालासोबत अटक केली. दरम्यान त्याचा साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला. भोरू भुवानसिंग रावत (वय २५ वर्ष) असे आरोपीचे नाव असून तो शेकापूर तालुका खकणार येथील रहिवासी आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाला खबऱ्याद्वारे माहिती मिळाली की, मध्यप्रदेश व बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद हे अंतराने जवळ असल्याने मध्यप्रदेशच्या बुऱ्हाणपूर येथून जळगांव जामोद याठिकाणी देशी पिस्टलची विक्री सुरू आहे. याबाबतची संपूर्ण माहिती गोळा केल्यानंतर माहिती मिळाली की, शनिवारी १२ डिसेंबर रोजी जळगांव जामोदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही व्यक्ती अवैध अग्निशस्त्र विक्री करिता घेऊन येत आहेत. त्यावरून जळगाव जामोद येथील बऱ्हाणपूर चौक येथे नाकाबंदी केली असताना दोन व्यक्ती मध्यप्रदेशमधून दुचाकीने येताना दिसले. ती दुचाकी पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यातील एकाला पकडण्यात आले व एकजण अंधाराचा फायदा घेऊन जंगलाच्या दिशेने पळून गेला.
देशी कट्ट्याची सरार्स होते विक्री -
सदर आरोपीकडून अडीच लाख रुपये किमतीचे सिल्वर रंगाच्या ५ देशी मॅगझिन कट्टे, ७ हजार ५०० रुपये किमतीचे १५ जिवंत काडतुसे, ५० हजार रुपये किमतीची एक दुचाकी, ५ हजार रुपये किमतीचा २ सीम असलेला एक मोबाईल, नगदी १९४० रुपये असा एकूण ३ लाख १४ हजार ४४० रुपये मुद्देमाल जप्त करून आरोपींवर शस्त्र अधिनियम कलम ३/२५ प्रमाणे कार्यवाही करून पो.स्टे.ज.जामोद यांचे ताब्यात दिले. पुढील तपास पोलीस करीत आहेत. सदर कारवाईत बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक बळीराम गिते यांच्या आदेशाने सहायक पोलीस निरीक्षक नागेशकुमार चतरकर, निलेश शेळके, श्रीकांत जिंदमवार, पोहेकॉ.अत्ताउल्लाह खान, पोना. गजानन आहेर, पोकॉ. युवराज शिंदे, पोकॉ. सतिष जाधव, मपोकॉ. सरिता वाकोडे यांनी सदर कार्यवाही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली.