बुलडाणा - नांदुरा येथील राष्ट्रीय महामार्गावरील आंबोडा फाट्यानजीक ट्रक व रुग्णवाहिकेची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात रुग्णवाहिकेच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज (१९ डिसेंबर) दुपारी घडली.
आंबोडा फाट्यानजीक झाला अपघात-
बऱ्हाणपूर येथील ऑल इज वेल रुग्णालयाची रुग्णवाहिका नागपूरला पेशंट सोडून परतत असताना आज दुपारी आंबोडा फाट्यानजीक विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने जबर धडक दिली. या अपघातात रुग्णवाहिकेचे चालक गजानन राजेंद्र पाटील (वय २५ रा लालबाग, बऱ्हाणपूर) हे जागीच ठार झाले, तर रवींद्रसिंह बहाद्दरसिंह ठाकूर (वय २४ रा वडनेर जोहरी, ता. आस्था जि. सिहोर मध्यप्रदेश) हे गंभीररित्या जखमी झाले आहेत.
सदर अपघाताची माहिती मिळताच १०८ चे डॉ शेख, चालक गणेश वनारे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला जवळील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. यावेळी डॉ जैस्वाल, डॉ बेंडे यांनी तातडीने उपचार केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने जखमीला पुढील उपचारासाठी मलकापूर येथे हलवण्यात आले. यावेळी पत्रकार प्रवीण डवंगे, शिवा घाटे, सोहेल भाई यांनी मदतकार्य केले.