बुलडाणा : दरवर्षी आषाढी एकादशीला जिल्ह्यातील लाखो भाविक पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाला जातात. वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून २५ जून रोजी संदीप शेळके यांच्या नेतृत्वात साडेतीनशे युवक-युवती वारीत सहभागी झाले. अभंग, भजन, विणा, टाळ, मृदुंगाची साथ देत वारकरी तरुणाई देहभान विसरली. सहा तासांत २३ किलोमीटरचे अंतर पूर्ण केलेल्या या पायदळ वारीत अध्यात्मासह विकासाचा गजर बघायला मिळाला.
पायदळ वारीला प्रारंभ : सोलापूर जिल्ह्यातील तिर्हे गावातून सकाळी सहा वाजता पायदळ वारीला प्रारंभ झाला. दुपारी बारा वाजता माचनूर येथील हनुमान मंदिरात वारीचा समारोप झाला. वारकऱ्यांनी सहा तासांत २३ किलोमोटरची पायदळ वारी पूर्ण केली. अभंग, भजनाला वीणा, टाळ, मृदुंगाची साथ देत वारकरी देहभान विसरले. पायदळ वारीतील महिलांच्या सहभागाने लक्ष वेधले. नियम आणि शिस्त पाळत वारकरी तरुणाईने सेवाभावाचा संदेश दिला.
वन बुलडाणा मिशन ही लोकचळवळ : जिल्ह्याच्या विकासाचा मुद्दा घेऊन संदीप शेळके यांनी वन बुलढाणा मिशन ही लोकचळवळ सुरु केली आहे. विकासाला मानवी चेहरा असला पाहिजे. गोरगरीब, शोषित, वंचित, आदिवासी अशा सर्वच घटकांना विकासाची संधी मिळायला हवी. तसेच विकास एकांगी नसावा. तर सामाजिक, आध्यात्मिक, साहित्यिक, सांस्कृतिक, औद्योगिक असा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. यासाठी वन बुलडाणा मिशनचे काम सुरु असल्याचे संदीप शेळके यांनी सांगितले.
अध्यात्माला विकासाची जोड : तरुणाईत प्रचंड ऊर्जा असते. ही ऊर्जा सकारात्मक कामासाठी वापरली गेल्यास चांगले परिणाम समोर येतात. आजची तरुणाई उद्याचे देशाचे भविष्य आहे. ही तरुणाई आध्यात्मिक मार्गाकडे वळल्यास त्यांच्यावर चांगले संस्कार घडतात. व्यसनापासून दूर राहणारे तरुण देशाच्या विकासात मोठे योगदान देऊ शकतात. पायदळ वारीतील युवक- युवतींचा उत्स्फूर्त सहभाग आनंदाची बाब असल्याचे शेळके म्हणाले.