बुलडाणा - शनिवारी (20 जून) रोजी जिल्ह्यात कोरोनाचा सहावा बळी गेला. धामणगांव बढे येथील 30 वर्षाच्या मृत युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे मृताच्या संपर्कातील व दफनविधीतील 11 जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. लवकरच त्यांचे स्वॅब टेस्टींग होणार आहे. अहवाल येण्यापूर्वीच मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन कसा करण्यात आला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र यावर बोलताना, नातेवाईकांकडून लिहून 'शासकीय प्रोटोकॉल'नुसार मृतदेह देण्यात आल्याची प्रतिक्रिया जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रेमचंद पंडित यांनी दिली आहे.
मलकापूर येथील 30 वर्षाचा युवक लॉकडाऊन काळात धामणगाव बढे या गावात वास्तव्यास होता. त्याला 9 जूनला ताप आला; आणि खोकला झाल्याचे समोर आले. या तरुणाने रुग्णालयात न जाता घरीच उपचार घेतले. तब्येतीत सुधारणा होत नसल्याने अखेर 16 जूनला त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान एक्सरे काढण्यात आला. यामध्ये त्याला निमोनिया असल्याचे निदान झाले. यावेळी त्याला 17 जून रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात भरती करण्यात आले होते.
उपचारादरम्यान कोरोनाच्या तपासणीसाठी त्याचे स्वॅब घेण्यात आले. 19 जून रोजी उपचारादरम्यान त्याचा सकाळी मृत्यू झाला. त्याच दिवशी दुपारी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. 19 जून रोजी त्याचा दफनविधी करण्यात आला. यावेळी 70 ते 80 नागरिकांनी उपस्थिती दर्शवल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
दरम्यान आज शनिवार त्याचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला. यानंतर मोताळ्याचे तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी व धामणगांव बढे ठाणेदार यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी केली. मृताच्या संपर्कातील व दफनविधीतील 11 जणांना क्वारंटाइन करण्यात आले. त्यांचे स्वॅब टेस्टींग होणार आहे. संबंधित युवक वास्तव्यास असलेला परिसर कन्टेन्मेंट झोन घोषित करण्यात आला.हा जिल्ह्यातील सहावा बळी आहे. सध्या 149 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. 95 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय. तसेच अद्याप ४८ जणांवर उपचार सुरू आहेत.