बुलडाणा - राज्यातील भाजपाने आपल्या खुर्चीसाठी ओबीसी समाजाचे राजकीय नुकसान करण्याचे 'पाप' ठरवून केले आहे, असा प्रत्यक्ष टोला नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. ते बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेदरम्यान बोलत होते. स्थानिक जिल्ह्याधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आज गुरुवारी सकाळी नाना पटोलेंच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे, जिल्हाध्यक्ष माजी आ. राहुल बोन्द्रे, माजी आ. हर्षवर्धन सपकाळ, संजय राठोड, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मनीषा पवार, जिल्हा परिषद सदस्या जयश्रीताई शेळके यांच्यासह अनेक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
'आरक्षणाचे मुद्दे पुढे करून राज्यसरकार स्थिर असल्याची भाजपाकडून दिशाभूल'
देवेंद्र फडणवीस व राज्यातील भाजपा पदाधिकारी कधी मराठा आरक्षण, कधी एससी-एसटी तर कधी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे करून राज्य सरकार अस्थिर असून सरकार आज पडणार, उद्या पडणार असल्याचे सांगून जनतेची दिशाभूल करत आहेत आणि आपली खुर्ची वाचवण्यासाठी ओबीसी समाजाचे राजकीय नुकसान करण्याचे पाप भाजपाने ठरवून केले असा आरोप या पत्रकार परिषदेत नाना पटोले यांनी केला.
'कोट्यावधी निष्पाप जनतेचा बळी केंद्र सरकारच्या निष्काळजी पणामुळे'
चार राज्यातील निवडणुका असल्याकारणाने ह्या निवडणुका घेण्यासाठी केंद्र सरकारने मार्च महिन्यामध्ये देश कोरोना मुक्त झाल्याचे सांगितले आणि मार्च महिन्याच्या अखेरीस संपूर्ण देशात कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली. देशामध्ये त्या वेळीच तात्काळ उपाययोजना केल्या असत्या तर देशामध्ये कोरोनाचा एवढा हाहाकार माजला नसता, मात्र मोदी प्रधानमंत्री नसून ते प्रचारजीवी आहेत आणि त्यांना कोरोनाच्या परिस्थितीत प्रचार करता आला नसता त्यामुळे देशातील जनतेला अंधारात ठेवून कोरोनामुळे देशातील कोट्यावधी निष्पाप जनतेचा बळी या केंद्र सरकारच्या निष्काळजी पणामुळे गेला असल्याचा आरोप देखील यावेळी नाना पटोले यांनी केला आहे.
हेही वाचा - आश्चर्य...कोरोनाची लस घेतल्यानंतर शरीर झाले लोहचुंबक, पाहा व्हिडिओ..