बुलडाणा - उधारीच्या अवघ्या तीनशे रुपयांच्या वादातून 50 वर्षीय व्यक्तीची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. मोताळा तालुक्यातील रोहिनखेडमध्ये ही घटना घडली. शेख कदीर शेख रज्जाब असे या हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी चार आरोपींना धामणगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
डोक्यात काठी लागल्याने मृत्यू
शेख कदीर शेख रज्जाब यांच्याकडे असलेल्या तीनशे रुपयांवरून फारुख शेख मुसा, शाहरुख शेख फारुख, जिया शेख फारुख व हारुण शेख मुसा यांनी त्यांच्याशी सोमवारी वाद घातला. मंगळवारी पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये वाद झाला, या भांडणादरम्यान शेख कदीर यांच्या डोक्यात काठी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला आहे. दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल करून, चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.