बुलडाणा - मुले होत नाहीत म्हणून विवाहितेची पती व सासरच्या मंडळीनी गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील मलकापूर येथील मोहनपुरा भागात उघडकीस आली आहे. मलकापूर शहर पोलिसांनी मृत सायमा कौसर नामक विवाहितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून शुक्रवारी गुन्हा दाखल केला. याप्रसंगी पती शे.मोहम्मद शे.यूसूफ, सासू जुलेखाबी शे.युसुफ, दिर शे.अमीन शे.युसुफ, दिराणी जमिलाबी शे.अमीन या सासरच्या मंडळीना अटक केले आहे. शे.हमीद शे.अहमद फरार झाला आहे. या धक्कादायक घटनेमुळे मलकापुरात खळबळ उडाली आहे.
मलकापूर येथील मोहनपुरा भागातील शेख.मोहम्मद शेख.यूसूफ यांच्यासोबत 2 वर्षांपूर्वी जमीर अहमद अ बशीर यांची मुलगी सायमा कौसर हिचा विवाह झाला होता. लग्नानंतर सायमाला मूल होत नसल्यामुळे तिचा पतीसह सासरकडील मंडळींकडून बऱ्याच दिवसांपासून शारिरिक व मानसिक छळ सरू होता. याची माहिती सायमाच्या माहेरी असतांनाही माहेरीकडील मंडळीनी सगळे ठीक होईल, अशी आशा होती. मात्र, अखेर २९ एप्रिलला रात्री ९ .३० च्या दरम्यान सासरच्या मंडळीने सायमा कौसर हिचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली.
याबाबत जमीर अहमद शेख बशीर यांनी मलकापुर शहर पोलीसात तक्रार दिली. या प्रकरणी मृत सायमा कौसरचे पती शे.मोहम्मद शे.यूसूफ, सासू जुलेखाबी शे.युसुफ, दिर शे.अमीन शे.युसुफ, दिराणी जमिलाबी शे.अमीन, मामसासरे शे.हमीद शे.अहमद अशा पाच जणांविरुद्ध शुक्रवारी कलम ३०२ , ४९८ अ , ३२३ , ३४ अन्वये पोलिसांनी गुन्हे दाखल करत ४ जणांना अटक केली आहे. यातील १ आरोपी शे.हमीद शे.अहमद फरार झाला आहे.