बुलडाणा - भाजपा किंवा केंद्र सरकारच्या विरोधात बोलेल त्याला ईडीची नोटीस येते. हे भारतामध्ये आता फॅशन झाली आहे. ज्याप्रकारे पोस्टातून पत्र येतात त्याचप्रकारे आता ईडीतून नोटिसा यायला लागल्या आहेत. हे सर्व दुर्दैवी आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बुलडाण्यातुन टीकास्त्र सोडले. खासदार सुप्रिया सुळे शनिवारी बुलडाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कृतज्ञता सोहळ्यासाठी आल्या होत्या. यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
जिजाऊचे स्मारक हे संपूर्ण देशाचे वैभव -
सिंदखेड राजा येथील जिजाऊचे स्मारक राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशाचे वैभव आहे. त्याचे जतन होणे गरजेचे आहे. यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी एकत्र येऊन या वास्तूंचे जतन करण्यासाठी योग्य ती पावले उचलायला पाहिजे. तेथे सर्व सुविधा पुरवायला पाहिजे. यासाठी आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करणार आहोत, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
विरोधकांनी आमच्यावर टीका करत राहावे -
महिला अत्याचाराबाबत महाविकास आघाडी सरकारवर विरोधक टीका करीत आहे. आमच्या विरोधकांनी आमच्यावर टीका करत रहावे. मात्र महाविकासआघाडी जनतेची सेवा करतच राहील, असाही टोला यावेळी सुळेंनी लगावला.