बुलडाणा - राज्यात बंदी असलेल्या गोवंश मांसाची वाहतूक करणाऱ्या एका अॅपे चालकाला मलकापूर रोडवर अडवणूक करून मारहाण केल्याची घटना मंगळवारी घडली आहे. एवढेच नाही तर या मारहाणीचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल देखील करण्यात आला आहे. या प्रकरणी बुलडाणा शहर पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल करून घेतल्या आहेत. तसेच अॅपे चालकावर गौवंश हत्या बंदी कायद्यानुसार तर मारहाण करणाऱ्या 4 युवकांवरुद्ध अडवणूक करून मारहाण करने, शिवीगाळ करने या प्रकरणी गुन्हे दाखळ कऱण्यात आले आहेत. तसेच अॅपे चालक आणि मारहाण करणाऱ्या दोन युवकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
शेख वसीम हा मंगळवारी सकाळी 10 वाजता मोताळ्याहुन-बुलडाण्याकडे जात होता. त्यावेळी राजूर घाटावरील बुलडाणा-मलकापूर रोडवर माऊली हॉटेल जवळ गजेंद्र अहीर आणि विशाल हडाले यांच्यासह अन्य तरुणांनी अॅपे थांबवून तपासणी केली असता, त्यावेळी अॅपेमध्ये गौवंशचा मास आढळून आले. त्यानंतर या तरुणांनी अॅपे चालकास मारहाण केली. तसेच या मारहाणीचा व्हिडिओ रेकोर्डिंग करून ते सोशल मीडियावर व्हायरल केले. या घटनेची माहिती मिळताच बुलडाणा शहर पोलिसांना घटनास्थळी धाव घेऊन चालकासह मारहाण करणाऱ्या युवकांना ताब्यात घेतले. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पोलीस स्टेशनमध्येही गर्दी होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले.
-परस्परविरोधी तक्रारीवरून गुन्हे दाखल,तीन जणांना अटक-
या प्रकरणी अॅपे चालक शेख वसीम याने पोलिसांत तक्रार दिली की गजेंद्र अहीर, विशाल हडाले आणि अन्य अनोळखी तरुणांनी अॅपे अडवून शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. तर गजेंद्र अहीर याने दिलेल्या तक्रारीनुसार बंदी असलेल्या गोवंश मासाची वाहतूक केल्या प्रकरणी गोवंश हऱ्या बंदी कायद्यानुसार कलम 5 नुसार गुन्हे चालक शेख वसीम विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
-पोलिसांची कारवाईची भूमिका संशयास्पद-
गौवंश मांसाची वाहतूक करणाऱ्या अॅपे चालकाला मारहाण करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामध्ये 6 ते 7 तरुण चालकाला मारहाण करीत आहेत. मात्र पोलिसांनी केवळ 4 युवकांवरुद्धच गुन्हे दाखल केले आहे. यात नियमाप्रमाणे व व्हिडिओ व्हायरल केल्या प्रकरणी गुन्हे का दाखल करण्यात आले नाही. त्यामुळे बुलडाणा शहर पोलिसांची कारवाई संशयास्पद असल्याचे समोर येत आहे.