बुलडाणा - एनआरसी मुद्द्यावर चर्चेदरम्यान बुलडाणा विधानसभेचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी बुलडाणा नगर परिषेदेच्या भारिपच्या नगराध्यक्षांवर धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. नगराध्यक्षा नजमुन्नीसा मोहम्मद सज्जाद यांना ४ अपत्ये असून दोन अपत्यांचीच नोंदणी केली आहे, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. याबाबत चौकशी केली गेली तर त्या २ अपत्यांचे भविष्य काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यावेळी सर्वांच्या भुवया उचंवल्या होत्या. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विविध मुद्यांबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नसंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आ. गायकवाड बोलत होते.
विशेष म्हणजे सन २००० नंतरपासून तिसरे अपत्य असलेल्यांना निवडणूक लढवता येत नाही. तिसरे अपत्य आढळल्यास अपात्रतेच्या कारवाईला समोर जावे लागते. म्हणूनच आ. गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्याने पत्रकार परिषदेत चर्चा रंगली होती. मात्र, ४ अपत्यांबाबत नगराध्यक्षांचे पती आणि नगरसेवक मोहम्मद सज्जाद यांनी आपल्याला दोनच अपत्ये असल्याचे सांगितले. या अगोदरही माजी नगराध्यक्ष दिवंगत हाजी इसहाक खान यांनी देखील तिसरे अपत्य असल्याबाबत प्रशासन आणि न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यावेळी देखील निकाल आमच्या बाजूने लागला असल्याचे सांगत नगरासेवक सज्जाद यांनी आ. गायकवाड यांच्या वक्तव्याचे खंडन केले.
हेही वाचा - 'वारिस पठाणमध्ये दम नाही; आमच्या विभागात आल्यावर विचारतो हिशोब'
अर्थसंकल्पीय अधिवेशनातून परत येत अधिवेशनात विविध मुद्द्यांबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नासंदर्भात माहिती देण्यासाठी शनिवारी स्थानिक विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. गायकवाड एनआरसीच्या मुद्द्यावर चर्चा केली. 'आता २ मूल जन्माला घातली तरच निवडणूक लढवता येईल म्हणून काही ठिकाणी काही लोकांनी दोनपेक्षा अधिक मुलांची नोंदणीच केलेली नाही. ३-४ तर कुठे ५ मुले जन्माला घातली असली तरी त्यांची नोंदच उपलब्ध नाही. उदाहरणार्थ नगराध्यक्षांना ४ अपत्ये आहेत. मात्र, त्यांनी नोंदणी करताना २ अपत्यांची नोंद केली आहे,' असे ते म्हणाले. 'आता उर्वरित २ अपत्यांची चौकशी कशी केली गेली आणि काही गैरप्रकार झाल्याचे आढळून आले तर, त्यांचे भविष्य काय असेल, असा प्रश्न त्यांनी केला.
हेही वाचा - परीक्षा केंद्रावर लोकप्रतिनिधीच्या मुलीला विशेष सेवा; मुख्याध्यापकांच्या कार्यालयात बसवून दिला जास्त वेळ