बुलडाणा - जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी १ मे रोजी शहीद झालेल्या २ पोलीस जवानांच्या अंत्यसंस्काराला गैरहजर होते. मागे पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यातही जिल्ह्यातील २ जवानांना वीरमरण आले होते. तेव्हाही मदन येरावार अंत्यसंस्काराला अनुपस्थित होते. त्यानंतर त्यांनी साधी विचारपूस किंवा सांत्वनपर भेटही दिली नाही, अशी खंत शहीद पोलीस जवान सर्जेराव खर्डे यांच्या पत्नी स्वाती खर्डे यांनी व्यक्ती केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात १ मे रोजी शीघ्र कृती दलाच्या १५ जवानांना घेऊन जाणाऱ्या खाजगी वाहनाला भूसुरुंगाने उडवून देण्यात आले. या हल्ल्यात गाडीतील सर्व १५ पोलीस जवान शहीद झाले. यात बुलडाणा जिल्ह्यातील पोलीस जवान सर्जेराव खर्डे आणि राजू गायकवाड यांचा समावेश होता.
या दोघांचेही पार्थिव मुख्यमंत्र्यांच्या सलामीसाठी थांबवून ठेवण्यात आले होते. त्यानंतर ते नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले. शिवाय तेथील पोलीस प्रशासनानेही पाहिजे तसे सहकार्य केले नसल्याचे स्वाती खर्डे यांनी म्हटले आहे. ग्रामस्थांनी देखील प्रशासनाच्या या वागणुकीचा आणि सरकारचा जाहीर निषेध केला आहे. आधीच दुःखाचा डोंगर कोसळला असताना पोलीस प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहीद जवानांच्या कुटुंबियांना नाहकच त्रास सहन करावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.
सरकारने शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. मात्र, त्याची अद्यापही कोणतीच कल्पना त्यांच्या पत्नीला नाही. तसेच, कोणतीही मदत मिळाली नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी एकदाही येथे येऊन भेट दिली नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
पालकत्व विसरलेल्या पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - काँग्रेसची मागणी
जिल्ह्याचे पालकत्वाची जबाबदारी सांभाळू न शकणाऱ्या पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस ने केली आहे. राज्याचे ऊर्जा, पर्यटन, अन्न व औषध मंत्री मदन येरावार यांची बुलडाणा जिल्हा पालकमंत्रीपदी नियुक्ती केली आहे. मात्र, जेव्हापासून ते जिल्ह्याचे पालकत्व सांभाळतात तेव्हापासून ते जबाबदारी विसरले आहेत, असे काँग्रेसने म्हटले आहे.