बुलडाणा Maratha Kranti Morcha : जालना जिल्ह्यातील आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ आज बुलडाण्यात मराठा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. तसंच मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी 'मराठा क्रांती मोर्चा' काढण्यात येतोय. 'एक मराठा, लाख मराठा' अशा घोषणा देत 'मराठा क्रांती मोर्चा'ला सुरुवात झाली. जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथील जरांगे पाटील यांची कन्याही या मोर्चात सहभागी झाली. बुलडाण्यात ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 'एक मराठा, लाख मराठा'च्या घोषणांनी बुलडाण्यातील संगम चौक परिसर दणाणून सोडलाय. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.
राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जालन्यातील सराटी गावात मनोज जरांगे पाटील गेल्या पंधरा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. यातच मराठा समाजानं राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन पुकारलं आहे. सकल मराठा समाजाच्या मोर्चात मुली, महिलांनी सहभाग घेतला आहे. या मोर्चात जरांगे पाटील यांची मुलगी तिच्या आईसह उपस्थित आहे. या मोर्चात बुलडाणा जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून मराठा समाज बांधव सहभागी झाले आहेत. तब्बल सात वर्षानंतर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बुलडाण्यात पुन्हा मोर्चा काढण्यात येतोय. या मोर्चाच्या माध्यमातून पुन्हा एकदा मराठा बांधवांची एकजूट पाहायला मिळतेय.
स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी : बुलडाणा जिल्ह्यातील 'मराठा क्रांती मोर्चा'च्या माध्यमातून अंतरवली सराटी येथे झालेल्या लाठीचार्जचा सकल मराठा समाजानं निषेध केला असून मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी केली आहे. या 'मराठा क्रांती मोर्चा'चं नेतृत्व मराठा युवतींनी केलंय. मराठा युवतीच्या शिष्टमंडळानं बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या मागण्याचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त : त्यामुळं बुलडाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा 'एक मराठा लाख मराठा' च्या घोषणा देत हजारो मराठा बांधव एकत्र आले आहेत. जालन्यातील लाठीहल्ल्याच्या विरोधात या मोर्चात निषेधही नोंदवण्यात आलाय. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी बुलडाणा पोलीस यंत्रणा खबरदारी घेतेय. तब्बल 1 हजार 9 पोलीस, वीस पोलिस निरीक्षक, चाळीस सहायक पोलिस निरीक्षकांचा तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बुलडाणा शहरातून जाणारी वाहतूकही वळवण्यात आली आहे.
हेही वाचा -