बुलडाणा - जिल्ह्याच्या सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील एका शाळेतील शिपायाला नदीवर पार्टी करणे जीवावर बेतले आहे. मंगळवारी तो नदीवर पोहायला गेला होता, मात्र तेथून तो परत आला नाही. ही घटना आज (बुधवार) उघडकीस आली. या प्रकरणी पार्टीसाठी सोबत गेलेल्या शिक्षकांनी बुलडाणा ग्रामीण पोलिसांना याबाबतची माहिती दिली आहे. दिलीप वैराळ असे बेपत्ता झालेल्या शिपायाचे नाव आहे.
साखरखेर्डा येथील जिजामाता विद्यालयातील बी. जी. चव्हाण, पुरुषोत्तम मानतकर व गवई या तीन शिक्षकांसह दिलीप वैराळ पार्टी करण्यासाठी मोताळा तालुक्यातील बोरखेडा येथील नदीवर मंगळवारी दुपारी गेले होते. त्यातील दिलीप वैराळ हा पोहण्यासाठी नदीपात्रात गेला व बराच काळ झाला तरी परत आला नाही. त्यामुळे ह्या तिन्ही शिक्षकांनी त्याचा शोध घेतला. मात्र तो आढळला नाही. या प्रकरणी शिक्षकांनी आज बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ज्या ठिकाणी शिपाई वैराळ पोहायला गेला त्या नदीत डोह असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस घटनास्थळी पोहचले असून दिलीप वैराळ यांचा शोध सुरू आहे.
हेही वाचा - धक्कादायक...! शेगावच्या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांच्या जेवणात आढळल्या अळ्या