बुलडाणा- तक्रार नोंदवण्यास जळगाव जामोद पोलिंसाकडून टाळाटाळ होत असल्याच्या कारणावरून फिर्यादीने सदर पोलीस ठाण्यात विष प्राशन केले होते. या घटनेत फिर्यादीचा मृत्यू झाला होता. ही घटना जळगाव जामोद येथे घडली होती. मृत्यूच्या चार दिवसानंतर मृत फिर्यादीच्या मृतदेहाला आज त्याच्या नातेवाईकांनी जामोद पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवले व तक्रारीस टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांवर कारवाईची मागणी केली.
जळगाव जामोद पोलीस ठाण्यांतर्गत २६ नोव्हेंबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास आसलगाव येथील ताई उखर्डा भांबे या महिलेने आपल्या जवळचेच नातेवाईक असलेले पुरुषोत्तम नारायण भोंबे यांच्याविरोधात जळगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सदर महिलेच्या तक्रारीवरून जळगाव पोलिसांनी आरोपी पुरुषोत्तम भाबे यांच्याविरुद्ध कलम २९४, ५०६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीमुळे आरोपी पुरुषोत्तम भोंबे यांचे वडील नारायण भोंबे नाराज झाले होते. त्यांच्या वतीनेसुद्धा जळगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
मात्र, पोलिसांकडून तक्रार घेतल्या जात नसल्याच्या कारणावरून आरडा-ओरड करत नारायण भोंबे यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात विषारी औषध प्राशन केले होते. त्यानंतर नारायण भोंबे यांना सर्वप्रथम जळगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारा करीता पाठविण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारार्थ त्यांना खामगाव येथील सिल्वर सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना नारायण भोंबे यांची शनिवारी रात्री प्राणज्योत मालवली. यानंतर भोंबे यांच्या नातेवाईकांकडून जळगाव जामोद पोलिसांवर विविध आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. आणि आज सकाळी जळगाव जामोद पोलीस ठाण्याच्या आवारात नारायण भोंबे यांच्या नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह आणून ठेवला. या घटनेमुळे पोलीस ठाणे परिसरात एकच खळबळ उडाली होती.
घटनेची माहिती मिळताच मालकापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी बोबडे यांनी जळगाव गाठून परिथिती निवळण्याचा प्रयत्न केला. नातेवाईकांचा आक्रोश पाहता चौकशीत पोलीस अधिकारी दोषी आढळल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांना निलंबित करू, असे आश्वासन बोबडे यांनी नातेवाईकांना दिले. त्यानंतर नारायण भोंबे यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. दुसरीकडे पोलीस निरीक्षक संजय जाधव यांनी नातेवाईकांचे आरोप फेटाळून लावत आम्ही त्या दिवशीच मृत व्यक्तीच्या मुलाचीसुद्धा तक्रार दाखल केली असून चार आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले असल्याचे सांगितले आहे. आता या याप्रकरणात चौकशी नंतरच सत्य बाहेर येणार आहे.
हेही वाचा- बुलडाणा जिल्हा परिषदेत भाजप-राष्ट्रवादीचा होणार घटस्फोट? महाविकास आघाडीमुळे नवीन राजकीय समीकरणे