बुलडाणा - संग्रामपूर तालुक्यातील पळसी झांसी येथील शंकरगिरी महाराज मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त महारोठाची निर्मिती करण्यात आली. ९ क्विंटल वजनाच्या या महाप्रसादाचे मंदिर प्रशासनाकडून वितरण करण्यात येत आहे. १२८ वर्षांची ही परंपरा आजतागायत कायम आहे.
पळसी झांसी येथे दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त शंकरगिरी महाराज यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. तपस्वी शंकरगिरी महाराजांनी सुरू केलेली रोठ बनवण्याची परंपरा आजही स्थानिक जपत आहेत. या महारोठाच्या सेवनाने सुख, शांती प्राप्त होवून आजार बरे होतात, अशी भाविकांची श्रध्दा आहे.
हेही वाचा - पेन्सिलीच्या टोकावर शिवलिंग साकारणारा अवलिया; पाहा व्हिडिओ
११ मीटर सुती कापड आणि त्यावर केळीची पाने लावून रात्रभर हा महारोठ तयार करण्यात आला. महाशिवरात्रीला रात्री ९ वाजतापासून ३० ते ४० भाविकांनी हा महारोठ बनवला. तत्पूर्वी महाराजांनी ठरवलेल्या जागेवर रानगोवऱ्याचे जगरे महाराजांच्या धुनीतून पेटविण्यात आले. नंतर रोडगे तयार करायला सुरूवात करण्यात आली. याचे एक एक किलोचे गोळे एका पितळी डेगमध्ये आणि कोपरात जमविण्यात आले. हे सर्व गोळे केळीच्या पानावर ११ मीटर कोऱ्या कापडावर एकावर एक रचण्यात आले. आज शनिवारी पहाटे हा महारोठ तयार झाला. हा ९ क्विंटल वजनाचा महाकाय महारोठ घट्ट केळीच्या बंधाने बांधून रान गोवऱ्याच्या विस्तवात भाजण्यासाठी ५ तास ठेवण्यात आला होता. दरवर्षी या रोठाचे वजन वाढवण्यात येत आहे.
हेही वाचा - VIDEO: पाहा.. का करतात 'या' गावात महाशिवरात्रीला कोंबड्याची पूजा
शेकडो मैलांचा प्रवास करून हिमालयातून १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात शंकरगिरी नावाचे आजानुबाहू तपस्वी या परिसरात आले होते. त्यांनी गावाच्या पूर्वेस दाट वटवृक्षाच्या सावलीत महादेवाच्या पिंडीची स्थापना केली. याच काळात महाराजांनी सव्वा मणाचे रोडगे बनवण्यास सुरुवात केली. ती कला ग्रामस्थांना देऊन गावाची एकजूट करण्याचे कामही या निमित्ताने महाराजांनी केले. या गावाला रोडगे निर्मितीमुळे मोठी ओळख प्राप्त झाली आहे. या महारोठाचा प्रसाद घेण्यासाठी बुलडाणा, अकोला, जळगाव आणि अमरावती जिल्ह्यातील भाविकांनी गर्दी केली आहे.
वर्षभर ठेवतात घरात रोठाचा प्रसाद
१९०५ मध्ये ग्रामस्थांच्या मदतीने या ठिकाणी शिवमंदिराची उभारणी करण्यात आली. त्यावेळी महाशिवरात्रीचा सर्वांना उपवास असल्याने त्याचे पारणे फेडण्यासाठी महाराजांनी रोडगे निर्मितीची सुरुवात केली. हा प्रसाद खाल्ल्याने बऱ्याच व्याधी दूर होतात, अशी आस्था असल्याने भाविक वर्षभर हा प्रसाद सांभाळून ठेवतात.
महारोठाचे साहित्य
सव्वा तीन क्विंटल कणीक, साडेतीन क्विंटल साखर, ८५ ते ९० किलो गावरान तूप, ७० ते ७५ लीटर दूध, ३५ किलो मनुका, ३५ किलो खारीक, १५ किलो बदाम, १५ किलो काजू, अडीच किलो विलायची, ५ किलो काळे मेरू, ५ किलो बडिशोप, १०० नग जायफळ, ५० ग्राम केसर, ३० किलो खोबराकिस हे साहित्य महारोठ तयार करण्यासाठी वापरण्यात येते.