बुलढाणा Maha First Agniveer Died : जवान अक्षय गवते हे बुलडाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथील राहणारे आहेत. सियाचिनमध्ये कर्तव्य बजावताना त्यांची प्रकृती ढासळली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर रुग्णालयात उपचार सुरू असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांची प्राणज्योत मालवली. महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निविराला वीरमरण आल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सियाचिनमध्ये बजावत होते कर्तव्य : पिंपळगाव सराई येथील वीर जवान अक्षय लक्ष्मण गवते हे सियाचीनमधील ग्लेशियरमध्ये कर्तव्यावर तैनात होते. मात्र कर्तव्य बजावत असताना त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे सैनिकी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर सैनिकी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांना 20 ऑक्टोबरच्या रात्री हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच अक्षय गवते यांची प्राणज्योत मालवली.
पिपळगाव सराईत होणार अंत्यसंस्कार : अक्षय गवते हे सियाचिन इथं कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आलं. त्यामुळे त्याबाबतची माहिती सैन्य दलाच्या वतीनं बुलडाणा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाला देण्यात आली आहे. अक्षय गवते या वीर जवानाचं पार्थिव सियाचिन इथून आज सायंकाळी छत्रपती संभाजीनगरात आणण्यात येणार आहे. त्यानंतर 23 ऑक्टोबरला त्यांचं पार्थिव त्यांच्या मूळगावी पिंपळगाव सराईत सकाळी दाखल होणार आहे. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कार्यालयाच्या वतीनं देण्यात आली आहे.
अग्निवीर म्हणून सैन्यात झाले होते दाखल : पिंपळगाव इथले अक्षय गवते हे 30 डिसेंबर 2022 ला अग्निवीर म्हणून सैन्यात दाखल झाले होते. सियाचिनमध्ये ते कर्तव्य बजावत होते. मात्र कर्तव्य बजावताना त्यांची प्रकृती ढासळल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अक्षय गवते हे त्यांच्या आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होते. तर त्यांना लहान बहीण असून त्यांचे आई-वडील शेती करतात. अग्निवीर अक्षय यांच्या वीरमरणाची वार्ता कळताच पिंपळगाव सराई गावावर शोककळा पसरली आहे.
हेही वाचा :