बुलडाणा - जिल्ह्यातील पशुधनावर लम्पी या आजाराने आक्रमण केले आहे. प्रामुख्याने बुलडाणा जिल्ह्यातील सहा तालुक्यात या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. या रोगाने बैल, गाय आणि लहान वासरांच्या अंगावर गाठी येत आहेत. त्यामुळे पशुधन शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मराठवाड्यातून आता विदर्भात या लम्पी आजाराने पाय पसरायला सुरुवात केली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, मेहकर, खामगाव, चिखली आणि मोताळा या सहा तालुक्यातील 27 गावातील 359 च्यावर गुरांना या रोगाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या आजाराच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा पशुसंवर्धन विभागामार्फत गुरांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे.
आतापर्यंत 23 हजार 832 गुरांचे लसीकरण पूर्ण झाले असून, 150 गुरं बरे झाले आहेत. अजूनही 71 हजार लस पशुसंवर्धन विभागाकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आपल्या गुरांना लस टोचून घेण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी केले आहे.