बुलडाणा : जिल्ह्यातील कोविड-19 चा प्रादुर्भाव बघता २३ मार्चपर्यंत टाळेबंदी कायम ठेवण्यात आली आहे. मात्र पूर्वीप्रमाणे नियम 'जैसे थे' ठेवण्यात आले आहे. १६ ते २३ मार्चपर्यंत सर्व दुकाने, आस्थापना यांना पूर्वीप्रमाणे सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उघडण्याची मुभा आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एस. रामामूर्ती यांनी सोमवारी याबाबत आदेश दिले.
पूर्वीप्रमाणे हे राहणार सुरू..
या आदेशात दिलेल्या माहितीनुसार, टाळेबंदीमध्ये दुध विक्रेते, दुध वितरण केंद्र सकाळी 6 ते दुपारी 3 व सायंकाळी 6 ते रात्री 9.30 वाजेपर्यंत सुरू राहतील. जिल्ह्यात सायंकाळी 6 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत टाळेबंदी लागू असणार आहे. या क्षेत्रात ज्या उद्योगांना सुरू ठेवण्याकरीता यापूर्वी परवानगी देण्यात आलेली आहे. ते सर्व उद्योग सुरू ठेवण्याकरीता परवानगी राहणार आहे. सर्व प्रकारच्या शासकीय कार्यालये, बँका अत्यावश्यक सेवा वगळून 50 टक्के संख्या ग्राह्य धरून सुरू राहतील. सर्व बँका नियमितपणे सुरू राहतील. सर्व प्रकारची उपहारगृहे, हॉटेल्स सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेसह सुरू राहतील. सायंकाळी 5 ते रात्री 9 पर्यंत केवळ पार्सल सुविधेस परवानगी असणार आहे.
लग्न समारंभाकरीता 50 व्यक्तींना तहसिलदारांकडून परवानगी अनुज्ञेय असणार आहे. लग्न समारंभासाठी उपस्थित असलेल्या 50 व्यक्तींमध्ये बँड पथकातील सदस्यांचा समावेश असेल. अंत्यविधीकरिता 20 व्यक्तींना परवानगी असेल. तर सर्व प्रकारची शैक्षणिक संस्थांमध्ये अशैक्षणिक कर्मचारी, संशोधन कर्मचारी, वैज्ञानिक यांना ई माहिती, उत्तर पत्रिका तपासणे, निकाल घोषीत करणे आदी कामांकरीता परवानगी असणार आहे. मालवाहतूक ही नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. आंतर जिल्हा बस वाहतूक एकूण प्रवाशी क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेसह सोशल डिस्टन्स व निर्जंतुकीकरण करून प्रवासी वाहतुकीस परवानगी राहील. चार चाकी वाहनात चालक व्यतिरिक्त तीन प्रवाशी, तीनचाकी वाहनात चालक व्यतिरिक्त दोन प्रवाशी व दुचाकीवर हेल्मेट व मास्क लावून दोन व्यक्तींना परवानगी असेल. ठोक भाजी मंडई सकाळी 3 ते 6 या कालावधीत सुरू असणार आहे. मात्र सदर मंडईत किरकोळ विक्रेते यांनाच प्रवेश राहील. नागरिकांना मॉर्निंग वॉक ला परवानगी असेल.
हे राहणार बंद..
सर्व प्रकारची सिनेमागृहे, व्ययामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन उद्याने, नाट्यगृहे, प्रेक्षक गृहे व इतर संबंधीत ठिकाणे ही बंद राहणार आहेत. तसेच सर्व प्रकारची सामाजिक, राजकीय, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व स्नेहसंमेलन या कालावधीत बंद असतील. सर्व धार्मिक स्थळे प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांसाठी पुर्णपणे बंद राहतील. तसेच प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य ठिकाणी सर्व धार्मिक ठिकाणी 10 व्यक्तींच्या उपस्थितीत सुरू राहतील. सर्व आठवडी बाजार बंद राहतील. जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, खाजगी शिकवणी केंद्र बंद राहतील. मात्र ऑनलाईन शिक्षणास परवानगी असेल.
टाळेबंदीचे यांना दाखविता येणार नाही कारण..
सर्व खाजगी वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सा सेवा त्यांचे नियमित वेळेनुसार सुरू राहतील. कोणतेही रुग्णालय बंदचा आधार घेवून रूग्णांना आवश्यक सेवा नाकारणार नाही. जिल्ह्यातील रुग्णवाहिका सेवा 24 तास सुरू राहतील. पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस यांची वाहतुक, वितरण, विक्री व साठवण सुरू राहील. या कालावधीत संपन्न होणाऱ्या पुर्वनियोजित परीक्षा त्यांचे वेळापत्रकानुसार घेण्यात येतील. तसेच परीक्षार्थी यांना सदर कालावधीमध्ये परीक्षेचे ओळखपत्र व पालकांना त्यांचे ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य असेल. आगामी होणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने अभ्यासिका एकूण आसन क्षमतेच्या केवळ 50 टक्के क्षमतेने सोशल डिस्टन्सिंग, सॅनीटायझर, मास्कचा वापर आदी नियमांचे पालन करून सुरू राहतील.
सर्व खाजगी आस्थापनांना करावे लागले कोरोना तपासणी..
सर्व प्रकारच्या खाजगी आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवरील सर्व कर्मचाऱ्यांची वेळोवेळी तपासणी करावी. संसर्ग सुरक्षा नियमांचे पालन करावे. कोविडची लक्षणे दिसून येताच संबधित कर्मचाऱ्याची आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी. कृषि उत्पन्न बाजार समितीच्या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता गर्दी नियंत्रण करून हात धुण्याची व्यवस्था करण्यात यावी.
5 व्यक्तींच्या उपस्थितीत देता येणार निवेदन..
कोरोना संसर्ग सुरक्षा नियमांचे पालन याठिकाणी होणे आवश्यक आहे.गर्दी जमवून करण्यात येणारी निर्दशने, मोर्चे, रॅली, आंदोलने यांना बंदी राहील. मात्र केवळ 5 व्यक्तींच्या उपस्थितीत स्थानिक पोलीस विभागाची परवानगी घेऊन संबंधीत शासकीय विभागास निवेदन देता येणार आहे.
टाळेबंदी आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई..
या आदेशांचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग प्रतिबंधात्मक कायद्याअन्वये कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. नागरीकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. कोरोना संसर्ग नियमांचे पालन करावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.