बुलडाणा - घरफोडी व चोरीच्या प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथकावर स्थानिकांनी हल्ला चढविला. या हल्ल्यात ४ पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाल्याची घटना आज शुक्रवारी २४ जानेवारी रोजी समोर आली. यावेळी झालेल्या झटापटीत आरोपी पोलिसांच्या हाताला झटका देवून पसार झाला. ही घटना साखरखेर्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्राम लोणी लव्हाळा येथे घडली आहे.
अमडापूर, साखरखेर्डा या पोलीस ठाण्यात चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल असलेला आरोपी जखमेश्वर शेनफळ शिंदे हा ग्राम लोणी लव्हाळा येथे आला असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक आढाव, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मोरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुधाकर काळे, सैय्यद हारुण, संजय नागवे, मपोका अनुराधा उबरहंडे व चालक रविंद्र भिसे यांचे पथक आरोपीस पकडण्यासाठी लोणी लव्हाळा येथे आज (शुक्रवारी) सकाळी 8 च्या सुमारास पोहचले. यावेळी आरोपी जखमेश्वर याने पोलिसांना पाहून पळ काढला असता पथकातील पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. दरम्यान, अचानक आरोपीचे नातेवाईक आणि स्थानिकांनी पोलीस पथकावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला करीत दगडफेक केली. इतकेच नव्हे तर, उकळता चहादेखील पोलीस हेडकॉन्स्टेबल सुधाकर काळे यांच्या अंगावर फेकला. दरम्यान झटापटीत पकडण्यात आलेला आरोपी जखमेश्वर हा पळून जाण्यास यशस्वी झाला.
हेही वाचा - शेगावच्या भट्टड जिनिंगला आग; बॉयलर जळून खाक
या प्राणघातक हल्ल्यात विजय मोरे, सुधाकर काळे, आढाव, संजय नागवे हे किरकोळ जखमी झाले. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मोरे यांच्या तक्रारीवरून साखरखेर्डा पोलिस ठाण्यात आरोपी जखमेश्वर शिंदे, शेनफळ शिंदे, रवि उर्फ बबल्या, शिवगंगा शिंदे, आरती, वैशाली, सुनिता भोसले व इतर अनोळखी ३ पुरुष, २ महिलांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार संग्राम पाटील करीत आहेत.
हेही वाचा - खामगांवात अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर धाड