बुलडाणा - सोमवारी दुपारी बुलडाण्यातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात उपप्रादेशिक अधिकारी जयश्री दुतोंडे व त्यांच्या चालकाला मारहाण झाली होती. याप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आणि घटनेच्या निषेधार्थ आज (24 जुलै) उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन पुकारले. अचानक पुकारलेल्या आंदोलनामुळे जिल्ह्याभरातील विविध कामासाठी पोहोचलेल्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला.
दुसरीकडे ड्रायव्हिंग स्कूलच्या संचालक असलेले सतीश पवार यांच्या कैकाडी समाजाच्यावतीनेही जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन सादर करून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दुतोंडे यांच्याविरुद्ध अॅट्रोसिटीनुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे या प्रकरणात आता राजकीय रंग असल्याचे दिसून येत आहे.
बुलडाणा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे खासगी वाहनचालक व सोमेश ड्रायव्हिंग स्कुलचालक यांच्या भावामध्ये मारहाण झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली होती. दरम्यान, बेकायदेशीर कागदावर स्वाक्षरी करण्याकरिता माझ्यावर आणि माझ्या वाहनचालकावर हल्ला केल्याची तक्रार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी बुलडाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये दिली. प्रकरणी सतीश पवार, दिपक पवार, रंगनाथ पवार यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून दिपक पवार, रंगनाथ पवार यांना अटक केले आहे.
दुसरीकडे ड्रायव्हिंग स्कुल चालकाने आरटीओ अधिकारी आणि खासगी वाहनचालकाने जातीवाचक शिवीगाळ करत 'जी फ़ॉम' नामकवरच्या पैश्याची मागणी करत भावाला मारहाण केल्याचा आरोप करत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दुतोंडेविरुद्ध अॅट्रोसिटीची तक्रार रंगनाथ पवार यांनी दिली आहे.
हे प्रकरण गाजत असतानाच आज बुधवार 24 जुलैला या प्रकरणात उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या बाजूने कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन पुकारले तर सोमेश ड्राव्हीग स्कुलचे संचालक सतीश पवार यांच्याकडून त्याच्या कैकाडी समाजाने रस्त्यावर उतरून समाज बांधवांवर खोटे गुन्हे दाखल करून जातीवाचक शिव्या देणाऱ्या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यावर अॅट्रोसिटीनुसार गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी केली. यामुळे या प्रकरणाला आता राजकीय रंग मिळाल्याचे दिसून येत आहे.
कार्यालयात हजर नसताना आपल्या खासगी चालकासोबत हाणामारी झाल्याने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दुतोंडे यांनी या वादामध्ये स्वतः उडी घेत आपल्यालाच मारहाण झाल्याची तक्रार पोलिसात नोंदवली. मात्र, प्रत्यक्षदर्शी यांच्यानुसार दुतोंडे घरीच होत्या, असे सांगण्यात आल्याने या प्रकरणाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.