बुलडाणा - विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान पार पडले. सर्वच उमेदवार आता 24 ऑक्टोबरची म्हणजे निकालाची वाट पाहत असून उमेदवारांची धाकधुक वाढली आहे. एकीकडे सर्वच उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत असताना मात्र बुलडाणा जिल्ह्यातील खामगावात फटाके फोडून आणि पेढे वाटून भाजपा सेना महायुतीचे उमेदवार आमदार आकाश फुंडकर यांचा विजय साजरा केल्या जात आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील मतदानाचा टक्का घसरला आहे. भाजप-शिवसेनेने मतदानानंतर युतीचीच सत्ता पुन्हा येणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे आता निकालाची उत्सुकता लागली आहे. एकीकडे उत्सुकता असताना मात्र दुसरीकडे विजयाचा विश्वास घेऊन खामगाव विधानसभा मतदारसंघातील युतीच्या कार्यकर्त्यांनी सोमवार सायंकाळपासून फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी केली. याशिवाय एकमेकांना पेढे भरवण्यात आले. एवढेच नव्हे तर बारामती येथील प्रसिद्ध डी.जे. देखील विजयी मिरवणुकीसाठी बुक करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता दोन दिवस बाकी असतानाच भाजप उमेदवारांनी विजयी झाल्याच्या थाटात फटाके फोडून जल्लोष साजरा केला. तसेच निकालानंतर होणाऱ्या विजयी मिरवणुकीची तयारी पूर्ण केली आहे.
आमदार अॅड आकाश फुंडकरांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी बंगल्यासमोर गर्दी करीत फटाक्यांची आतषबाजी देखील केली. दुसरीकडे काँग्रेस-राहस्त्रवाडी आघाडीचे उमेदवार ज्ञानेश्वर पाटील यांच्या समर्थकांनीही विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे भाजपकडून विजयाच्या दाव्यावर हा कान्फिडन्स आहे की ओव्हर कॉन्फिडन्स हे येत्या 24 ऑक्टोबरलाच स्पष्ट होईल.