बुलडाणा - 'हिरा ग्रुप ऑफ कंपनी'च्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या सीईओ नोहेरा शेखची चौकशी एसआयटीमार्फत करण्याची मागणी गुंतवणूकदारांनी केली आहे. विषेश म्हणजे आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या चौकशीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत गुंतवणूकदारांनी ही मागणी केली आहे.
हैदराबाद येथील हिरा ग्रुप ऑफ कंपनीच्या माध्यमातून ग्राहकांना जास्तीच्या रुपयांचे आमिष दाखवून 50 हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचा गंडा घालणाऱ्या या कंपनी विरोधात ठिकठिकाणी तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर बुलडाण्यात देखील एका गुंतवणूकदाराने 16 लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रारी दाखल केल्याने नोहेरा शेखवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुलडाणा आर्थिक शाखेने नोहेरा शेख यांना न्यायालयाच्या आदेशाने मुंबई येथील भायखळा कारागृहातून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
नोहेरा शेखला 10 जानेवारीला न्यायालयाने 14 जानेवारीपर्यंत चौकशीसाठी पोलीस कोठडी सुनावली. या कार्यकाळात शेखला मिळालेल्या पोलीस कोठडीपैकी 3 दिवस आजारी असल्याचे कारण देत शेख हा 3 दिवस रुग्णालयात उपचारासाठी दाखल होता. त्यानंतरही पुढील सुनावणीवेळी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस कोठडी न मागता न्यायालयीन कोठडी मागितली. त्यामुळे गुंतवणूकदारांनी प्रश्नचिन्ह निर्माण करत, केवळ 2 दिवसात पोलिसांनी काय चौकशी केली असेल? असा सवाल उपस्थित करत या प्रकरणाची एसआयटी समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.