बुलडाणा - शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या घरासमोर उभी असलेली इनोव्हा वाहनावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना मंगळवार 26 मेला पहाटे 3 वाजेच्या सुमारास घडली. प्रकरणी सकाळीच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले आणि इनोव्हा वाहनाचे निरीक्षण केले.
आमदार गायकवाडांच्या परिवाराला इजा पोहोचवण्याचा आरोप -
आमदार संजय गायकवाड हे मुंबईला गेले होते. आज बुधवारी 26 मेच्या मध्यरात्री दीड वाजता ते घरी परत आले. त्यानंतर 3 वाजेच्या सुमारास 2 अज्ञात व्यक्तींनी टू व्हीलरवर येऊन त्यांच्या घरासमोर उभी असलेली एमएच 28 बीजे 3132 क्रमांकाची इनोव्हा वाहनाची पेट्रोलची टॅंक जिथे असते, त्याठिकाणी पेट्रोल टाकून इनोव्हा वाहन पेटवून दिली. या इनोव्हाच्या पुढे आणि मागे 4 ते 5 गाड्या उभ्या होत्या. एक गाडी पेटली असता ती सर्व वाहने पेटली जातील व घराचे घर क्षतिग्रस्त होऊन गायकवाड परिवाराला इजा पोहोचविण्याच्या उद्देशाने हा हल्ला केल्या गेल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, हा हल्ला करतेवेळी या परिसरातील विद्युत पुरवठा हल्लेखोरांनी तोडला होता, असाही कयास व्यक्त होत आहे.
हेही वाचा - ...नाहीतर गंगेची फक्त हिंदू शववाहिनी होईल, शिवसेनेचा भाजपला इशारा
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना दिली घटनेची माहिती -
या घटनेच्या चौकशीसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सकाळी घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले. तर याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही या घटनेची माहिती दिली आहे. प्रकरणी पोलीस अज्ञातांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कोरोनाकाळात केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत -
मला कोरोनाचे विषाणू मिळाले असते तर ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्या तोंडात कोंबले असते. आमदार संजय गायकवाड यांच्या या विधानामुळे राज्यभरात भाजपच्यावतीने आंदोलन पुकारण्यात आले होते. तर मुस्लिम लोक मांसाहार करतात. म्हणून त्यांच्यामध्ये प्रतिकार शक्ती जास्त आहे. यामुळे त्यांच्यामध्ये कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या कमी आहे. म्हणून या काळात हिंदूंनीदेखील मांसाहार करा. दररोज मटण-चिकन, अंडे खाण्याचा सल्ला आमदार संजय गायकवाड यांनी दिला होता. यावेळी देखील वारकऱ्यांकडून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला होता. वारकरी संप्रदायातील अनेकांनी आमदार गायकवाडांशी मोबाईलद्वारे झालेल्या संभाषणाच्या ऑडियो क्लिपदेखील व्हायरल झाल्या होता.
हेही वाचा - उजनीच्या पाण्याचा वाद शरद पवारांच्या गोविंदबाग निवासस्थानावर; इंदापूरचे आंदोलक ताब्यात