बुलडाणा - महाराष्ट्रामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन बनवण्याच्या 7 कंपन्या असून सध्या 50 हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध आहे. 17 एप्रिलपर्यंत 70 हजार इंजेक्शनचा साठा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सध्याचा 50 हजाराचा आकडा कमी आहे. तो वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करत असल्याचे राज्याचे अन्न व औषधी प्रशासनमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
डॉ. शिंगणे म्हणाले की, मेडिकल प्रोटोकॉल नुसारच कोरोना रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याच्या दृष्टिकोनातून सूचना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. काही खाजगी डॉक्टर रुग्ण हा दवाखान्यात दाखल होताच त्याला रेमडेसिवीर इंजेक्शन देतात. प्रोटोकॉलप्रमाणे एका रुग्णाला 6 इंजेक्शन द्यावे लागतात. इंजेक्शनची संख्या लक्षात घेता ज्यांना आवश्यकता आहे, त्यांनाच डॉक्टरांनी इंजेक्शन द्यावे अशी सूचनाही डॉक्टरांना देण्यात येणार आल्याचे त्यांनी सांगितले.
क्षय आरोग्य धाम येथे आयसीयु युनीट
वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या बघता स्त्री रूग्णालयात नवीन 100 बेडची व्यवस्था करण्यात यावी. क्षयआरोग्यधाम येथे आयसीयु युनीट तयार करावे. द्रवयुक्त ऑक्सीजनची मागणी नोंदवून परिस्थितीनुरूप द्रवयुक्त ऑक्सीजनचा साठाही पुरेसा करून ठेवावा. अशी सूचना देत पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी कोविडचा पॉझीटीव्हीटी दर, मृत्यू दर, लसीकरणाचे प्रमाण, ऑक्सीजनचा साठा व पुरवठा, रेमडेसिवीरचा साठा व पुरवठा आदींचा आढावा घेतला. तसेच यंत्रणांकडून अडचणी जाणून घेतल्या.
हेही वाचा - मराठा संघटनांकडून मला धमकीचे कॉल्स येत आहेत'
हेही वाचा - परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढणार? वाचा 'त्या' अहवालातील धक्कादायक खुलासे