बुलडाणा - कोरोनाच्या संकटात ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा उपयोग केला जात आहे. मात्र, दुर्गम भागांमध्ये इंटरनेटची सुविधा नसल्यामुळे तेथील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून एक शिक्षक कोरोनाचे नियम पाळून ज्ञानदानाचे कार्य करत आहे.
हेही वाचा - चॉकलेटच्या रॅपरमधून गांजाची तस्करी करणाऱ्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या
बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील डोंगराच्या पायथ्याशी कंडारी हे गाव वसलेले आहे. या गावातील 20 ते 25 विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या नांदुरा येथील कोठारी महाविद्यालयांमध्ये शिक्षणासाठी जातात. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. कोरोना काळात विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी ऑनलाइन शिक्षणपद्धतीचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. नांदुरा येथील कोठारी माध्यमिक विद्यालयानेसुद्धा ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यास सुरुवात केली, मात्र ऑनलाइन शिक्षण घेत असताना नांदुरा तालुक्यातील कंडारी या दुर्गम भागातील विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणामध्ये सहभागी होत नसल्याची बाब शाळा प्रशासनाच्या लक्षात आली.
शाळा प्रशासनाने शिक्षक श्याम खारोडे यांना कंडारी गावात पाठविले. येथे खारोडे यांनी विद्यार्थ्यांशी व पालकांशी चर्चा केली असता त्यांच्या लक्षात आले की, गावात मोबाईलची रेंज कमी-अधिक प्रमाणात असल्यामुळे ऑनलाइन शिक्षण पद्धतीला बाधा निर्माण होत आहे. तर, अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांकडे अँड्रॉइड मोबाईलच नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये अडचण येत आहे. सरपंच आणि गावकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर श्याम खारोडे यांनी गावातील हनुमंताच्या मंदिरावर असलेल्या सभामंडपात वर्ग घेण्यास सुरुवात केली. मास्क, सॅनिटायझरचा वापर करून, सामाजिक अंतर राखत कोरोनाचे सर्व नियम पाळून गावातील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य सुरू केले. इयत्ता चौथी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम ते करत आहे.
ग्रामीण भागातील अनेक पालकांकडे मोबाईल, लॅपटॉप या तंत्रज्ञानाच्या सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थी शैक्षणिक वातावरणाला पारखा झाला आहे. कोविड सारख्या भयंकर महामारीपासून वाचण्यासाठी शासनाला नाईलाजाने शाळा बंद कराव्या लागल्या, यामुळे पालकांमध्ये आपल्या पाल्याबद्दल शिक्षणाची चिंता वाढली आहे. काही पालकांची हलाखीची परिस्तिथी असल्याने त्यांच्याजवळ मोबाईल नाही, तर कुठे नेटवर्कची सुविधा नाही. मात्र, ज्ञानदान देण्यासाठी सुविधांची वाट न पाहता शिक्षक श्याम खारोडे या शिक्षकाने पुढाकार घेवून अशा परिस्थितीत जोखीम स्विकारून कोरोनाला अटकाव घालण्यासाठीच्या त्रिसूत्रीचे पालन करून विद्यार्थ्यांना ज्ञानदान सुरू ठेवल आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची ज्योत तेवत ठेवली आहे. या आदर्श शिक्षकाचा शिक्षकदिनी जितका गौरव करावा तितका कमी.
हेही वाचा - बुलडाणा जिल्ह्यातील 'त्या' अपघाता प्रकरणी कंत्राटदारासह चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल