बुलडाणा - पावसामुळे यावर्षी राज्यभरात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील सर्व पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. विदर्भासह संपूर्ण राज्यात नुकसानाची सारखीच परिस्थिती आहे. राज्याच्या कोणत्याच भागातील शेतकऱ्यांच्या घरात यावर्षी उत्पन्न आले नसल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. अशावेळी शासन व प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहुन आधार देण्याची गरज असताना राजकीय व्यवस्था सत्ता स्थापनेच्या गोंधळात तर प्रशासन आदेशाच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर कोणत्याही अटी न लादता शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 1 लाख अनुदानाची मागणी केली. जर 4 दिवसांत निर्णय न घेतल्यास ११ नोव्हेंबर सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यभर चक्का जाम आंदोलन करणार असल्याची घोषणा आमदार देवेंद्र भुयार यांनी आज बुलडाण्यातून केली.
विदर्भातील 'स्वाभिमानी'चे पहिले आमदार देवेंद्र भुयार यांनी ५ नोव्हेंबरला स्थानिक विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिदेत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर, राणा चंदन यांची प्रमुख उपस्थिती होती. पावसाने खरीप हंगामातील सर्व पिके उद्धवस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे. शासनाने कोणत्याही अटी न लादता शेतकऱ्यांप्रती संवेदनशीलता दाखवून तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करावी, अशी आग्रही मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे, अशी माहिती यावेळी रविकांत तुपकर यांनी दिली.
हेही वाचा - लोणार तालुक्यात नदीच्या पुरात वाहून गेलेल्या दोघांचे मृतदेह सापडले
त्यासाठी राजू शेट्टी, आमदार भुयार यांच्यासह मंत्रालयात कृषी सचिव डवले यांची भेट घेतली. पीकविमा संदर्भातील जाचक अटी दूर करण्याचीही मागणी त्यांच्याकडे केल्याचे तुपकरांनी सांगितले. आ. भुयार यांनी यावेळी बोलताना सांगितले, की कॉर्पोरेट कंपन्याचे कर्ज जसे मोठ्या मनाने माफ केले जाते त्याच पद्धतीने आता सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करुन त्यांना भरघोस मदत देणे आवश्यक आहे. पीकविम्यासाठी कंपन्यांनी स्वतंत्रपणे सर्व्हे न करता महसूल आणि कृषी विभागाने केलेले पंचनामे अंतिम मानून नुकसान भरपाई देण्याच गरज आहे. नुकसानभरपाईच्या अटींमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे.
हेही वाचा - बुलडाण्यात अतिवृष्टीमुळे अनेक शेळ्या-मेंढ्या मृत्युमुखी, मेंढपाळांनी केली मदतीची मागणी
कोल्हापूर, सातारा, सांगली भागात महापुराने पूर्ण ऊस नष्ट झाला तर पावसाने नाशिक भागातील द्राक्ष व इतर फळबागा उद्ध्वस्त झाल्या. मराठवाड्यात कापूस, मका व इतर पिके हातातून गेली आणि विदर्भात देखील सोयाबीन, मका, ज्वारी, संत्री यांसह सर्वच पिके हातातून गेली आहे. एकंदरीत संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने आता कोणत्याही अटी न लादता शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. गांधीगीरीच्या मार्गाने शासन-प्रशासन ऐकणार नसेल तर आता भगतसिंगाच्या मार्गाने रस्त्यावर उतरण्याची आमची तयारी असून आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून ११ नोव्हेंबर रोजी राज्यभर चक्का जामा आंदोलन करणार असल्याची घोषणा यावेळी आ. भुयार यांनी केली.
हेही वाचा - बुलडाण्यात पावसाचा कहर; ज्ञानगंगा नदीला महापूर, २ गावांचा संपर्क तुटला
काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली दहा हजार कोटींची मदत अत्यंत तुटपुंजी आहे, त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी आ. भुयार यांनी यावेळी केली. दरम्यान, पत्रकार परिषदेपूर्वी रविकांत तुपकर, आ. भुयार यांनी सावळा, भादोला, वाडी, वरवंड, डोंगर खंडाळा या भागात नुकसानीची पाहणी करुन शेकऱ्यांनी संवाद साधला. तर पत्रकार परिषदेनंतर चिखली आणि सिंदखेड राजा तालुक्यातील नुकसान झालेल्या पिकांच्या पाहणीसाठी ते रवाना झाले होते.