बुलडाणा - खामगाव-पिंपळगाव राजा रोडवर झालेल्या अपघातात ढोरपगाव येथील दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. घाटपुरी शिवारात या दाम्पत्याच्या दुचाकीला बोलेरो पिकपने जोरदार धडक दिली. ही घटना आज रविवारी सकाळी 9च्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात दाम्पत्याची दोन वर्षांची चिमुकली मुलगी वाचली आहे.
शेगाव तालुक्यात लग्नाला निघाले होते दाम्पत्य -
खामगाव तालुक्यातील ढोरपगाव येथील जगदीश मुंढे व लक्ष्मी मुंढे हे दोघे पती पत्नी शेगाव तालुक्यातील जवळा येथील मामाकडे दुचाकीने (क्र. एमएच 28 ए वाय 1554) जात होते. दरम्यान खामगाव-पिंपळगाव राजा रोडवर घाटपुरी शिवारात वॉटर फिल्टर जवळ त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगाने येत असलेल्या बोलेरो पीकअपने (.एम एच 28 ए बी 3964) जोरदार धडक दिली. या अपघातात जगदीश मुंढे याचा जागीच मृत्यू झाला. तर लक्ष्मी मुंढे यांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाल. सुदैवाने त्याची दोन वर्षांची चिमुकली मुलगी यात वाचली आहे.
हेही वाचा - मराठा आरक्षण : अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली उद्या नवी दिल्लीत वकिलांची बैठक
या घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करत दोघांचे मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदन साठी पाठविले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.