बुलडाणा - जिल्ह्यात परतीच्या मुसळधार पावसाने सध्या अक्षरशः कहर केला आहे. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील गणेशपूर भागातील अनेक जनावरांसह शेळ्या मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. एवढेच नव्हे तर २०० च्या जवळपास कोंबड्यांचाही मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात मागील 3 दिवसांपासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील घाटाखाली नुकसानाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. दिवठाणा, पोरज हे गाव सध्याही पाण्याने वेढलेले आहे. येथील गावकरी मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. तर दुसरीकडे खामगाव तालुक्यातील मेंढपाळ बहुल भाग असलेल्या गणेशपूर हिवरखेड, शिराळा, निरोड, लाखनवाडा, कोंटी, नांद्री या गावातील मेंढपाळांवर अतिवृष्टीचे संकट कोसळले आहे.
हेही वाचा - कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्याने कसारा घाटात भीषण अपघात; २० ते २५ वाहनांना धडक
संततधार पावसामुळे परिसरातील अनेक शेळ्या, मेंढ्यांचा मृत्यू झाले आहेत. दुधाळ जनावरे ही बळी पडलेले आहेत. यामुळे शेतात राब राब राबून शेळ्या मेंढ्यांची पालन करणाऱ्या मेंढपाळांवर संकट कोसळले आहे. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास याचे आदेश शासनाने दिलेले आहेत. तर मेंढपाळांचे लाखो रुपयांच्या नुकसानाची दखल शासनाने घ्यावी, अशी मागणी मेंढपाळांनी केली आहे. यासंदर्भात धनगर समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकारी खामगाव यांना निवेदन देण्यात आले.
हेही वाचा - बरेवाईट करण्याचा विचार मनात आणू नका - आदित्य ठाकरेंचा शेतकऱ्यांना धीर