बुलडाणा - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असताना गृह विलगीकरणाच्या कारणाने पुन्हा कोरोनाबाधितांच्या संख्या वाढू नये यासाठी बुलडाण्यातील गृह विलगीकरण रद्द करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. संस्था विलगीकरणासाठी जिल्ह्यात 9 हजार 105 बेड्सची व्यवस्था करण्यात आली. यामध्ये गुरुवारी 27 मेपर्यंत 1 हजार 587 लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधितांना दाखल करण्यात आले आहे.
गृह विलगीकरणातील रुग्ण बाहेर फिरल्याने गृह विलगीकरण रद्द
बुलडाणा जिल्ह्यात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत या आठवड्यात घट झाली आहे. गृह विलगीकरणामध्ये राहणारे कोरोनाबाधित रुग्ण हे बाहेर फिरून कोरोना संसर्ग वाढवत असल्याचे समोर आले. यामुळे जिल्ह्यात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये या दृष्टीने 25 मेपासून जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी एका आदेशाने जिल्ह्यात लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधित रुग्णांसाठी गृह विलगीकरणाचा पर्याय रद्द करून अशा रुग्णांंना संस्था विलगीकरणमध्ये ठेवण्याची सक्ती केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात संस्था विलगीकरणासाठी जिल्हा प्रशासनाकडून शासकीय 2 हजार 605 आणि प्रत्येक गावामध्ये लोकसहभागातून व स्थानिक प्रतिनिधी मिळून किन्होळा पॅटर्न सारखे 6 हजार 500 असे एकूण 9 हजार 105 बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. गुरुवारी 27 मेपर्यंत 1 हजार 587 लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना संस्था विलगीकरणात दाखल करण्यात आल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक प्रशांत पाटील यांनी दिली.
कोरोनाबाधितांच्या उपचारासाठीची व्यवस्था
लक्षणे असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांसाठी बुलडाणा जिल्ह्यात 800 बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यामध्ये स्त्री कोविड रुग्णालयामध्ये 250 बेड्सपैकी 250 रुग्ण, टीबी कोविड रुग्णालयातील 100 बेडपैकी 57 रुग्ण, अपंग कोविड रुग्णालयातील 100 बेडपैकी 36 रुग्ण, खांमगावतील कोविड रुग्णालयातील 100 बेडपैकी 80 रुग्ण, शेगांव कोविड रुग्णालयातील 50 बेडपैकी 28 रुग्ण, मलकापूर कोविड रुग्णालयातील 50 बेडपैकी 31 रुग्ण, देऊळगांवराजा कोविड रुग्णालयातील 50 बेडपैकी 20 रुग्ण, नांदुरा कोविड रुग्णालयातील 50 बेडपैकी 30 रुग्ण, हिवरा आश्रम कोविड रुग्णालयातील 100 बेडपैकी 30 रुग्ण, संग्रामपूर कोविड रुग्णालयातील 30 बेडपैकी 10 रुग्ण आणि सिंदखेडराजा कोविड रुग्णालयातील 30 बेडपैकी 10 रुग्ण उपचार घेत आहे.
कोरोनाबाधितांकरीता संस्था विलगीकरणासाठीची व्यवस्था
कोरोनाबाधित रुग्णांसाठी संस्था विलगीकरणासाठी बुलडाणा शहरातील जिजामाता महाविद्यालयाच्या मुलीच्या वसतिगृहात आणि आयटीआय विद्यालयात प्रत्येकी 100 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरावरील कोविड केअर सेंटरमध्ये प्रत्येकी 100 किंवा 200 बेड्स असे एकूण 2 हजार 605 बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये 587 लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना विलगीकरण करण्यात आले आहे. शिवाय प्रत्येक गावामध्ये लोकसहभागातून व स्थानिक प्रतिनिधी मिळून किन्होळा पॅटर्न सारखे 6 हजार 500 बेडची विलगीकरण करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये जवळपास 1 हजार लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधितांना विलगीकरण करण्यात आल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत पाटील यांनी दिली आहे.
हेही वाचा - प्रतीक्षा संपली! ५जीच्या प्रायोगिक चाचणीकरिता स्पेक्ट्रमचे दूरसंचार कंपन्यांना वाटप